मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोलीची जवाहरलाल नेहरु नगरपरिषद शाळा राज्यात तृतीय

गडचिरोली :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून गडचिरोली येथील नगरपरिषदेच्या जवाहरलाल नेहरू शाळेने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांकावर पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा धानोरे तर ठाणे येथील एनएमएमसी द्वितीय क्रमाकांवर आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल याबाबतची घोषणा केली. जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्याथ्यांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन या वर्षी देखील या अभियानाचा दुसरा टप्पा 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे 98 हजार शाळांमधून सुमारे 1 कोटी 91 लाख विद्यार्थी तर सुमारे 6 लाख 60 हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण 150 गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.

विजेत्या शाळांना १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पारितोषिक दिले जाणार आहे. राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळविलेल्या गडचिरोलीच्या शाळेला 21 लाख रुपयांचे पारितोषिक जाहिर झाले आहे. राज्यस्तर, विभागस्तर व महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शासकीय व खाजगी गटात एकूण ६६ शाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हुडकेश्वर-नरसाळा भागातील पायाभूत सुविधा भक्कम करू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Oct 13 , 2024
– अमृत-2 योजनांतर्गत मलनि:सारण व गटरलाईन प्रकल्पाचे भूमिपूजन नागपूर :- नागपूर महानगरासह लगतच्या हुडकेश्वर – नरसाळा भागामध्ये मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्या निर्माण झाल्या. यासाठी पायाभूत सुविधा नव्याने निर्माण करणे आवश्यक होते. रस्ते आवश्यक होते. नवीन विकसीत झालेल्या अधिवास क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा देणे गरजेचे होते. मुख्यमंत्री असताना सर्व प्रथम प्राधान्याने येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. नरसाळा हुडकेश्वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com