– अंबाझरी तलाव स्वच्छतेसाठी नागरिकांना मनपाचे आवाहन
नागपूर :- अंबाझरी तलावात दिवसेंदिवस वाढत असलेली जलपर्णी जनसहभागातून काढण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आलेला आहे. रविवारी १६ जून रोजी सकाळी ६ वाजता स्वयंसेवी संस्था, जलतरणपटू, नागरिक तसेच विविध नागरी समूहांच्या सहकार्याने जलपर्णी काढण्यात येणार आहे. अंबाझरी तलाव स्वच्छतेसाठी इच्छुक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावातील जलपर्णी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनपा सतत कार्य करीत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या पद्धतीने जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून, येत्या रविवारी १६ जून रोजी सकाळी ६ वाजता नागरिकांच्या विविध समूहांच्या सहकार्याने जलपर्णी काढण्यात येणार आहे.
मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत प्रसिद्ध अंबाझरी तलावात जलपर्णी तयार झाली असून, त्याच्या स्वच्छतेसाठी मनपाकडून अंबाझरी तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत रविवारी १६ जून रोजी सकाळी ६ वाजता पासून जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. अंबाझरी तलावातील जलपर्णी काढण्यासाठी मनपाद्वारे मोठ्या प्रमाणात मशिनरी व मनुष्यबळ लावण्यात आले आहे. या कार्यात शहरातील जलतरणपटू, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या संख्येत उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.