जयभीम जयघोषाचे प्रवर्तक, डिप्रेस क्लास फेडरेशनचे पहिले महासचिव, स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रांताध्यक्ष, विदर्भातील समता सैनिक दलाचे संस्थापक, राज्य विधिमंडळातील अस्पृश्यांचे सदस्य, सीपी अँड बेरार मधील लोकप्रिय नेते बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी कामठी निवासी बाबू हरदास एल एन यांची 6 जानेवारी रोजी 121 वी जयंती आहे, त्यांनी दिलेल्या “जयभीम” च्या घोषवाक्याला जगाने ब्रँड म्हणून स्वीकारले आहे त्या निमित्ताने जयभीम च्या जनकाच्या कार्याचा धावता आढावा बहुजन चळवळीतील कार्यकर्ते उत्तम शेवडे यांनी वाचता करिता घेतला आहे.
बाबू हरदास एल एन यांचे नाव हरदास लक्ष्मण नगरारे 6 जानेवारी 1904 ला कामठी, नागपूर येथे त्यांचा जन्म. पटवर्धन हायस्कूल मध्ये मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण. 16 व्या वर्षी विवाह. आर्थिक गरिबीमुळे रोज मजुरी केली. वयाच्या अठराव्या वर्षी 1921 ला महारट्टा नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी अस्पृश्य समाजातील अन्याय अत्याचार व वाईट चाली रीतीवर प्रकाश टाकला.
स्थानिक तरुणांच्या मदतीने समाज सेवा पथक स्थापून अस्पृश्यांसाठी कार्य सुरू केले. वयाच्या 19 व्या वर्षी 1923 ला कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची नागपूर मुक्कामी भेट घेऊन अस्पृश्यांच्या समस्या विषयी निवेदन केले. तत्कालीन वराड मध्यप्रांत चे गव्हर्नर जनरल यांचा सत्कार करून अस्पृश्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्वाची मागणी केली. नागपूर जिल्ह्यातील त्यावेळी मंडई भरविल्या जात, ज्यामध्ये नाच , गाणे, तमाशा होत असत, त्यातून अस्पृश्य महिलांच्या विटंबना होत होत्या, अशा वेळी मंडई महात्मे नावाचे पुस्तक लिहून त्यातील वाईट शालीरीतीवर प्रकाश टाकला.
समाजाच्या शैक्षणिक उन्नती करता त्यांनी रात्रीच्या शाळा काढल्या, युवकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी वीर बालक नावाचे स्वतः नाटक लिहून त्याचे अनेक प्रयोग केले. कामठीतील अस्पृश्यांसाठी स्वतः मंदिरे बांधली व प्रस्थापित सवर्णांना आव्हान दिले. रामटेक च्या टेकडीवरील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळत नव्हता व अंबाला तलावात आंघोळीची मनाई होती, अशावेळी किसन फागोजी बनसोडे यांच्या सहकार्याने त्या परिसरात स्वतंत्र विहीर व मंदिर सुद्धा बांधले होते. 1930 च्या नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रहात कामठी येथून मोठ्या प्रमाणात टीम सहभागी झाली होती, त्या सर्वांचे हरदास यांनी स्वागत केले होते.
1930 च्या दरम्यान हरदास यांनी रेवाराम कवाडे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या शाखा उभारण्याचे काम केले. तत्कालीन नागपूरचे पोलीस अधीक्षक आगाखान यांना एसएसडी च्या माध्यमातून तरुणांच्या फौजेने मानवंदना दिली, परिणामतः त्यातील 70 तरुणांची पोलीस विभागात भरती मिळवली.
डिप्रेश क्लासेस फेडरेशन
भारताच्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू असताना ब्रिटिशांनी भारतीय पुढाऱ्यांना12 नोव्हेंबर 1930 ला गोलमेज परिषदे करता लंडनला निमंत्रित केले होते. बाबासाहेबांनी 8,9 ऑगस्ट 1930 रोजी शाम (व्यंकटेश) थेटर (चिटणीस पार्क) येथे दोन दिवशीय अधिवेशन बोलावले. तिथे ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लास फेडरेशन ची स्थापना करण्यात आली त्याचे अध्यक्ष म्हणून मद्रासचे रावसाहेब मुनीस्वामी व बाबू हरदास यांची सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. याच अधिवेशनात बाबासाहेबांना अस्पृश्यांचे सर्वमान्य नेते म्हणून सन्मानित करण्यात आले. याच अधिवेशनात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळावा असा एकमताने प्रस्ताव पास करण्यात आला.
अस्पृश्यांचा पुढारी कोण?
5 सप्टेंबर 1931 ला भरविण्यात आलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचा खरा पुढारी कोण? गांधी की आंबेडकर असा काँग्रेसने वाद उभा केला. यामुळे हिंदू पुढाऱ्यात खळबळ माजली असताना अस्पृश्य समाजातील अस्पृश्यांचे खरे नेते बाबासाहेब आंबेडकरच आहेत अशा पद्धतीच्या लंडनला देशभरातून शेकडो तारा पाठवण्यात आल्या. त्यातील 32 तारा एकट्या कामठीतून पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे बाबासाहेबांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून इंग्रजांनी मान्यता दिली. व अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे ही जातीय निवाड्याद्वारे मान्य केले. याचे श्रेय एल एन हरदास यांना जाते.
त्यानंतर गांधींनी 21 दिवसाचे उपोषण करून ती मागणी मागे घ्यायला लावली, ज्यामुळे पुणेकरार घडला. 24 सप्टेंबर 1932 रोजी झालेल्या या करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुकुंद मलिक, मुनीस्वामी पिल्ले, श्रीनिवासन, स्वामी अच्युतानंद, एम सी राजा आदी नेत्यांच्या सह्या आहेत.
1993 ला अकोला येथे दलित परिषद सुरू असताना यांचा एकुलता एक मुलगा मृत पावल्याची बातमी मिळाली असताना, त्यांनी परिषद सोडून जाणे योग्य नसल्याचे सांगून मुलाला परस्पर दफन करून टाकावे अशी माहिती पाठवली. यावरून ते समाजाप्रती व संघटनेप्रति किती प्रामाणिक होते याचा प्रत्यय येतो.
मध्य प्रांतातील छत्तीसगड मधील सतनामी पंथगुरु बाबा मुक्तावनदास यांचे भाऊ आगमनदास यांना राजकीय हेतूने अडकविण्यात आले होते. रायपूर कोर्टाने त्याला फाशी सुनावली होती. बाबूंच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी 29 एप्रिल 1937 रोजी नागपूर हायकोर्टात आगमनाची फाशी रद्द केली. त्यामुळे 30 एप्रिल रोजी कामठीच्या बैल बाजार मैदानावर बाबासाहेबांचे वादळ, वाऱ्या व पावसात भाषण झाले. अनेक कार्यकर्ते पडून गेले. व पुन्हा बाबासाहेबांना भाषण देण्यास विनंती करू लागले, बाबासाहेबांनी त्यांना खडसावून सांगत मला अशा पळपुट्या कार्यकर्त्यांची गरज नसल्याचे सांगितले.
बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवला मुक्कामी धर्मांतराची घोषणा केल्याने त्यांच्या घोषणेच्या समर्थनार्थ बाबासाहेबांनी 30, 31 मे 1936 रोजी दलित कॉन्फरन्स चे मुंबईत आयोजन केले होते. त्याला स्वतः बाबू हरदास यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या घोषणेच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या.
स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली मुंबईचे व्ही डी प्रधान यांची अध्यक्ष म्हणून, तर वऱ्हाड मध्यप्रांत पक्षाचे नेते म्हणून बाबू एल एन हरदास यांना निवडण्यात आले. दरम्यान प्रांतीय विधिमंडळाच्या 175 पैकी 15 जागा राखीव होत्या. मध्यप्रांतीय कायदेमंडळात नागपूर शहर विभाग हा अस्पृश्यांकरता राखीव होता. बाबू यावेळी घोडा या चिन्हावर निवडणूक लढले व काँग्रेसच्या (तुलाराम साखरे व हेमचंद्रराव खांडेकर) उमेदवारांचा पराभव करून बाबू प्रांतिक कौन्सिल मध्ये निवडून आले. 17 फेब्रुवारी 1937 ला बाबू लोकप्रतिनिधी बनले. यावेळी स्वतंत्र मजूर पक्षाच्या नावावर भंडाऱ्यातून राघोबाजी घोडीचोर, चंद्रपुरातून देवाजी खोब्रागडे, यवतमाळातून डि के भगत हे चार प्रतिनिधी निवडून आले होते. शिवाय पक्षाचे समर्थक वर्धेतून दशरथ पाटील, उमरेड मधून सिताराम पाटील, छिंदवाड्यातून जांभुळकर हे स्वातंत्ररित्या निवडून आले होते, हे स्वतंत्र प्रतिनिधी नंतर स्वतंत्र मजूर पक्षात सहभागी झाले. पक्षालाही भरघोस यश बाबूंच्या समर्थ नेतृत्वामुळे लाभले. त्यामुळे बाबू हरदास एल एन यांचा 27 फेब्रुवारी 1937 रोजी मानपत्र देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
जयभीम चा नारा
मध्यप्रांतीय कौन्सिल मध्ये सिपी अँड बेरार मधे निवडून आल्यावर बाबूकडे नमस्कार दीनबंधू म्हणणारी शेकडो मंडळी दररोज येत असत. बाबूही जयभीम म्हणून त्यांचे स्वागत करीत. 1934 ला बाबूंनी भीम विजय संघ स्थापन केला. याद्वारे जयभीम चा प्रचार केला सुरुवातीला जयभीम ला प्रत्युत्तर म्हणून बलभीमचा प्रचार होता. पुढे बलभीम ऐवजी जयभीम म्हणून रिस्पॉन्स देणे सुरू झाले. बाबूंच्या कल्पनेपूर्वी जयभीम चा प्रचार नव्हता. कायदे मंडळात निवडून आल्यामुळे बाबूंनी बिडी कामगारांच्या समस्या विषयी अनेक योजना आखून भंडारा, गोंदिया वगैरे ठिकाणी दौरे आखले. दरम्यान जेवनाकडे व झोपेकडे दुर्लक्ष झाले परिणामत: त्यांची प्रकृती खालावली व त्यांचे 12 जानेवारी 1939 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले. 1934 ला ज्या बाबू हरदास एल एन यांनी जयभीम या घोषवाक्याची निर्मिती केली आज तो “जयभीम” संपूर्ण जगात व करोडोंच्या मुखात पोहोचलेला आहे. आज जयभीम समता, स्वतंत्रता, न्याय व बंधुतेचे ब्रँड झालेले आहे.
– उत्तम शेवडे संचालक, मान्यवर कांशीराम रिसर्च सेंटर नागपूर, व मीडिया प्रभारी महाराष्ट्र प्रदेश बसपा