Ø विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
Ø नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
नागपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती नीमित्त नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेच्या तयारीबाबत आज प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी चवरे यांनी आढावा घेतला. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रामात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. चवरे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, क्रीडा व सेवा संचालनालयाचे उपसंचालक शेखर पाटील यांच्यासह दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.
येत्या 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती नीमित्त राज्यात ‘जय शिवाजी जय भारत’ या अजय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर विभागातही या पदयात्रेचे यशस्वी आयोजन होण्याच्या दृष्टीने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या पदयात्रेमध्ये नेहरू युवा केंद्र, महानगरपालिका व जिल्हा परिषदेचे शालेय विद्यार्थी, विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. पदयात्रेदरम्यान लेझीम, दानपट्टा, मलखांब आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण होणार आहे. तसेच रक्तदान शिबीरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती घेवून डॉ. चवरे यांनी उपस्थितांना आवश्यक सूचना केल्या.
नागपूरात 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वाजता राजे रघुजी भोसले यांच्या स्मृतीस्थळापासून ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा निघणार असून महाल परिसरारतील गांधी गेट येथे समारोप होणार आहे. या पदयात्रेत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्यासह विविध संघटना, शाळा, महाविद्यालये, शिवप्रेमी जनता व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.