– राजे रघुजी भोसले महाराज स्मारक ते गांधी गेट चौक पर्यंत पदयात्रा
नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार ‘जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रा’ नागपूर महानगरपालिकेद्वारे काढण्यात येणार आहे.
नागपूर शहरातून राजे रघुजी भोसले स्मारक स्थळ ते गांधी गेट या मार्गावरुन पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पदयात्रेच्या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. याप्रसंगी उपायुक्त विजय देशमुख, गणेश राठोड, परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, विकास रायबोले, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.
बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता सक्करदरा चौकातील राजे रघुजी भोसले स्मारक स्थळ येथून पदयात्रेचा शुभारंभ होईल.
जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रेला सक्करदरा चौकातील राजे रघुजी भोसले स्मारक स्थळ येथून सुरुवात होईल. पुढे गजानन चौक जुनी शुक्रवारी, केशव द्वार चौक, रेशीमबाग चौक, सी.पी. अँड बेरार चौक, कोतवाली चौक या मार्गे गांधी गेट चौक येथे पदयात्रा पोहोचेल. गांधी गेट चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन पदयात्रेचे समापन होईल.
या पदयात्रेमध्ये सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. या पदयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा तसेच https://mybharat.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक माहिती नमूद करून आपले ई-प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने केले आहे.