नागपूर :- भारताच्या चांद्रयान-3 ने यशस्वी लँडिंग केलं आहे. भारत देशात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी उभारलेल्या इस्रोच्या चांद्रयान ने इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची शान चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलं आहे. 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन आज राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले होते आणि भारताच्या चांद्रयान-3 ने यशस्वी लँडिंग केलं. भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रत्येक भारतीयाची छाती गर्व आणि अभिमानाने फुलून गेली आहे.
चांद्रयान-2 मोहिमेत अपशय आल्यानंतरही भारतानं हार मानली नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 2020 मध्ये चांद्रयान-3 मोहिमेला इस्रोकडून सुरुवात करण्यात आली आणि त्याचं फळ आज मिळालं आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता यशस्वी उड्डाण केलं आणि आज या चांद्रयान-3 नं चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आहे आणि याला जोड मिळाली ती भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विज्ञानप्रेमाची. जवाहरलाल नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत अवकाश संशोधनाला बळ दिलं आहे असे ही डॉ. राऊत म्हणालेत.
भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट केले असून सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या.