आदिवासींच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार व्हावा – राज्यपाल राधाकृष्णन

– राज्यपालांच्या हस्ते राज्यातील नवनियुक्त आदिवासी आमदारांचा सत्कार

मुंबई :- आदिवासींच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार झाला पाहिजे. विकसित भारत म्हणजे सर्वसमावेशक विकास. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी सर्व लोकनियुक्त प्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यातील नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांचा सत्कार राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी (दि. २२) सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांतांतर्फे नवनियुक्त आदिवासी खासदार व आमदारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रपती भवन येथे झालेल्या राज्यपालांच्या परिषदेत आपण आदिवासी विकासविषयक उपसमितीचे अध्यक्ष होतो असे सांगून आदिवासी विकासाकडे विशेष लक्ष्य देण्यासाठी राजभवन येथील आदिवासी कक्ष पुनरुज्जीवित करण्यात आला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यात आदर्श आदिवासी गाव विकसित केले जात असून त्याठिकाणी निवासी संकुल, शाळा, आरोग्यकेंद्र, समाजमंदिर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी सुविधा असतील. याशिवाय नाशिक येथे स्वतंत्र आदिवासी विद्यापीठ निर्माण केले जाणार असून तेथे आयआयटी दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय व एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय उभारले जाईल. या विद्यापीठातील ८० टक्के जागा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतील. आपण लवकरच राज्यातील आदिवासी गावांना भेट देणार असून अति आदिम समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्यासाठी जागा देण्यात यावी, अशी मागणी केली. वनहक्क कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी तसेच कातकरी समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जावे, अशी अपेक्षा डॉ. उईके यांनी व्यक्त केली.

यावेळी वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांनी लोकशाही, पंचायत, स्त्री-पुरुष समानता, पर्यावरण रक्षण याबाबतीत आदिवासी जीवनशैली समाजाला मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आदिवासी आमदारांनी आपल्या समाजाच्या समस्या पक्षाच्या व्यासपीठावर तसेच विधानमंडळात जोरकसपणे मांडाव्या, असे त्यांनी सांगितले. आमदारांनी निवडून आलेल्या आपल्या भागात पाच वर्षे विकास पुरुष होऊन कार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आश्रमाच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष विष्णू सुरूम, ऑलिम्पिक स्पर्धेतील धावपटू कविता राऊत तुंगार तसेच नवनियुक्त आदिवासी आमदार उपस्थित होते. यावेळी राज्यातील १७ आदिवासी आमदारांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते सर्व आमदार राजेश पाडवी, काशीराम पावरा, केवलराम काळे, राजू तोडसाम, दिलीप बोरसे, हरिश्चंद्र भोये, आमश्या पाडवी, मंजुळा गावित, चंद्रकांत सोनावणे, राजेंद्र गावित, नितीन पवार, दौलत दरोडा, डॉ किरण लहामटे, शांताराम मोरे, भीमराव केराम, नरहरी झिरवाळ व डॉ अशोक उईके यांचा सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अश्विन, नैना, दिग्विजय, संजना ला सुवर्ण पदक - खासदार क्रीडा महोत्सव : तलतरण स्पर्धा 

Thu Jan 23 , 2025
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेमध्ये अश्विन मोकाशी, नैना गोखले, दिग्विजय आदमने, संजना जोशी यांनी सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलावामध्ये ही स्पर्धा पार पडली. 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात 35 वर्षावरील वयोगटात अश्विन मोकाशी (03:00:25) आणि नैना गोखले (03:24:31) यांनी सुवर्ण पदक पटकाविले. पुरुष गटात आदित्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!