मुंबई/ पुणे :-करोना काळात स्थानिक प्रशासनाने राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीने लाखो लोकांचे जीव वाचवण्याचे महत्वाचे काम केले. पंरतु, या जीवघेण्या काळातही काहींनी आपले उखळ पांढरे करुन घेतले.अशात मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह इतरांची देखील चौकशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करावी अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केली. करोना काळात प्रत्येक जिल्ह्यात आणि शहरांमध्ये ‘जम्बो कोव्हिड सेंटर’ उभारण्यात आले होते.या उभारणी दरम्यान भ्रष्टाचार झाला का,याची चौकशी राज्यातील तपास यंत्रणांनी करावी,अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रव्यवहार करणार असून पोलिसांमार्फत या व्यवहारांची चौकशीचे आदेश देण्याची विनंती करणार असल्याचे पाटील म्हणाले.
संकटकाळात नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत स्वत:ची घरे भरणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या व्यवहारांची त्यामुळे सखोल चौकशी आवश्यक आहे. भ्रष्टाचार कुठले नेते शामिल आहेत, कुणी कुणी भ्रष्टाचाराचा मलीदा लाटला हे समोर आणण्याचे आव्हान आता तपास यंत्रणांना आहे. भ्रष्टाचार करणार्यांंची हयगय केली जावू नये, असे देखील पाटील म्हणाले. मुंबई पालिका आयुक्तांनी १०० कोटींचे कंत्राट कसे आणि कुणाला-कुणाच्या सांगण्यावरून दिले हे समोर येणे आवश्यक आहे. भ्रष्टाचाराच्या चिखलात हात माखलेल्यांना शिक्षा केली नाही, तर संघटना आंदोलन करेल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
करोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आहे.करोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झाले. शिवाय कंत्राट प्राप्त करुन घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्रे बीएमसीकडे सादर केल्याचा आरोप आहे. बेनामी कंपन्यांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट देऊन कोटींचा घोटाळा केल्याचा दावा करण्यात आला आहे.