मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
शैक्षणिक प्रशासनात उल्लेखनीय योगदानासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबद्दल सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था (एनआयईपीए), नवी दिल्ली या संस्थेद्वारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे, सर्वांगीण विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न, त्याचबरोबर मोफत शिक्षणाची समान संधी आणि भौतिक सुविधांची उपलब्धता करून देणे तसेच महानगरपालिका शाळांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या शाळांमधील पटसंख्येत वाढ व्हावी यासाठी ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य – एक लक्ष ’ ही विशेष मोहीम राबविणे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांबाबत शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.