आंतरराष्ट्रीय महिला दिन

सुदृढ समाजनिर्मितीसाठी महिलाभिमुख प्रशासनाची गरज    प्राजक्ता लवंगारे-वर्मा

        नागपूर, दि. 8 : शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना महिलांच्या हिताकडे लक्ष केंद्रीत झाले पाहिजे. आदरासह हक्काचा स्त्रोत असे वातावरण कुटुंबात तसेच कामाच्या ठिकाणीही महिलांना मिळाले तर समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत जाईल. आत्मसन्मानाची वागणूक महिलाभिमुख प्रशासनातून दिल्या गेल्यास सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज केले.

            वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिलाभिमुख प्रशासनाचे महत्व’ या विषयावर परिविक्षाधिन प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिसंवादात जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर शहरच्या सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, वनामतीच्या संचालिका भुवनेश्वरी एस. यांनी मार्गदर्शन केले. नागपूरच्या अखिल भारतीय स्वराज्य संस्थेचे प्रादेशिक संचालक डॉ. जयंत पाठक यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

            श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, महसूल विभागात प्रशासकीय महिला अधिकारी म्हणून काम करताना अनेक अनुभव आले. महिलांमध्ये कणखरपणा, कुठलेही काम करण्याची जिद्द असली तर महिला म्हणून भेदभाव होत नाही. कौटुंबिक संगोपन, आत्मसन्मान, मुलांप्रमाणेच समान वागणूक दिली तर समाजातही त्याप्रमाणेच वागणूक मिळेल. यासाठी लिंगभेदभावा संदर्भात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही संवेदनशिलता निर्माण झाली पाहिजे. महिलांनी महसूल, पोलीस विभाग अशा जोखीम असणाऱ्या विभागात काम करताना त्या पदाचे कौशल्य आत्मसात करुन त्याप्रमाणे व्यक्तिमत्वात बदल आणणे फार आवश्यक असते. विकासात्मक काम करताना नियामक विकासावरही भर दिला गेला पाहिजे.  प्रत्येक महिलाने स्वत:साठी वेळ काढावा असे सांगताना विविध प्रशासकीय पदांवर काम करताना त्यांना महिलांच्या संदर्भात आलेल्या अनुभवांचे कथन त्यांनी केले.

संघटनेतून सन्मान निर्मिती – आर. विमला

            स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून महिलांनी सर्वांगिण उन्नती केल्याची आंध्रप्रदेश, केरळमध्ये उत्तम उदाहरणे आहेत. महिलांच्या एकसंघ होण्याने फक्त पैशांची बचत होत नसून त्यांच्यात विचारांची आदानप्रदान होते. महिलांनी एकमेकांशी संवाद साधल्याने अनेक घरगुती, कौटुंबिक, आर्थिक अडचणी सुटल्या आहेत. मातृसत्ताक राज्यांमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. ज्याप्रमाणे स्वयं सहायता बचत गटात दशसुत्रीचा वापर केला जातो, त्याचप्रमाणे समाजात किंवा कामाच्या ठिकाणी दशसुत्रीचा अवलंब झाल्यास महिला अधिक सक्षमपणे आपले कर्तृत्व गाजवू शकतात. स्वयं सहायता गटांत पाच सामाजिक तत्वांचा वापर केला जातो. आरोग्य व पोषणा संबंधी जागृती, पाळीच्यासमयी स्वच्छता, संवेदना, लोकांना सहभागी करण्याचे धोरण, ताणतणाव व्यवस्थापन आदी विषयावर विचारांचे आदान प्रदान होत असते. स्वयं सहायता बचत गटांच्या माध्यमातून शाश्वत उपजीविकेचे साधन महिलांनी निर्माण केलीत यासंबंधी श्रीमती विमला यांनी अनुभव कथन केले. स्वयंसहायता गटांप्रमाणेच महिलांनी एकसंघ होऊन काम केले तर समाजात त्यांच्याप्रती सन्मान निर्माण होऊन महिलाभिमुख समाजनिर्मिती होईल, असे विचार त्यांनी मांडले.

                                                                     महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – अश्वती दोरजे

        पोलीस अधिकारी म्हणून करिअर निवडताना महिलांच्या सुरक्षेलाच प्राधान्य दिले. महिला ही आदिशक्ती आहे. निर्सगाने महिलेला प्रेम, करुना प्रसंगी धाडस, कणखरता व शक्ती असे गुण दिले आहेत. प्रत्येक महिलेने स्वत:ला कमी लेखू नये. शारिरीक, बौध्दीक क्षमतांना वाव देऊन स्वयंभू बनावे. कुठलेही करिअर निवडताना स्वत:चा परिघ ठरवू नये. महिलांनी आपल्या क्षमता ओळखून वाटचाल करावी. महिलांच्या सुरक्षेस माझे प्राधान्य असून नागपूर शहरात ‘पोलीस दिदी’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शहरातील 33 पोलीसठाणी सहभागी आहेत. या अभियांतर्गत चमूत महिला अधिकारी व कर्मचारी आहेत. या उपक्रमाला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला असून याअंतर्गत प्रत्येक शाळेतील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना गुड टच, बॅड टच संदर्भात तसेच महिला सुरक्षेचे धडे देण्यात येत आहे. तत्काळ प्रतिसाद व कारवाई प्रक्रियेमुळे पोलीस दिदी लोकप्रिय झाल्या असून शाळेतील मुलींनी दिदींसोबत हितगूज केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

            वनामतीच्या संचालिका भुवनेश्वरी एस. यांनी अतिथींचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

SNG BASKETBALL LEAGUE 2022 - Celebrate International Woman's Day

Wed Mar 9 , 2022
International Woman’s Day celebrated at SNG courts in SNG BASKETBALL LEAGUE 2022. Mothers of all the participants participated in the Women’s Day celebration. More than 300 participants including Mothers of boys and girls took part in various activities and games. The girl players enjoyed playing Basketball game with their Mothers. Different competitions like Shooting competition, Tunnel Race, Dribbling Competition etc […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com