– दीर्घकालीन आणि तात्पुरत्या उपाययोजनांची घेतली माहिती
नागपूर :- नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांद्वारे अंबाझरी तलाव आणि नाग नदीसंदर्भात सुरू असलेल्या विविध आपत्ती निवारण कामांची पाहणी शुक्रवार दि. २४ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता पवार, उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव संदीप जोशी, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे यांच्यासह आपत्ती निवारणाशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे शहरातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मनपासह नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंचन विभाग आणि महा मेट्रो या विभागांची बैठक घेउन आपत्ती निवारण कामाची आखणी केली होती. त्यानुसार त्यांनी आज अंबाझरी तलाव, अंबाझरी ते क्रेझी केसल पूल, नाग नदीचे क्रेझी केसल, अंबाझरी दहन घाट, नासुप्र स्केटिंग रिंक, रामदासपेठ पूल येथील पात्राचे आपत्ती निवारणाच्या दृष्टीने रुंदीकरण व खोलीकरण कामाची पाहणी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, सप्टेंबर महिन्यातील पुरानंतर विविध विभागांनी समन्वयाने काम केले. पुराची कारणे, अडथळे यावर विचार करून कामे सुरू करण्यात आली आहेत. आपत्ती निवारणाच्या दृष्टीने अंबाझरी तलाव आणि नाग नदीशी संबंधित दीर्घकालीन आणि तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येत आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होउ नये, निवासी भागांमध्ये पाणी जाउ नये यादृष्टीने कार्य केले जात आहे. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये तलावातील पाण्याची पातळी वाढू नये याकरिता तलावाच्या सांडव्यावरील भितींवर सिंचन विभागाद्वारे तीन दार लावले जाणार आहेत. अंबाझरी तलाव ते क्रेझी केसल यादरम्यानच्या पूलाचे काम सुरू असून एका बाजूचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. नासुप्र स्केटिंग रिंकवरील बांधकाम तोडून पात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण देखील करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाण्याला अडथळा निर्माण होतो तो देखील दूर करण्यात येत आहे. अंबाझरी दहन घाट परिसरातून नदीच्या पात्राची रुंदी वाढविण्यात येत आहे. एकूणच पावसाळ्यात नागरिकांना त्रास होउ नये यासाठी आवश्यक त्या सर्व आपत्ती निवारण उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री यांच्या पाहणी दौ-यामध्ये आपत्ती निवारणाशी संबंधित विभागांचे अधिकारी मनपाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता विजय गुरूबक्षाणी, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चोपडे, कार्यकारी अभियंता प्रांजली ठोंबसे आदी उपस्थित होते.