त्रिनिदाद येथे क्रिकेट अकादमी स्थापन करणार असल्याची माहिती

– त्रिनिदाद – टोबॅगो पंतप्रधानांचे राज्यपालांकडून स्वागत

मुंबई :- भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ ख्रिस्टोफर राऊली व त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज (गुरु. १६) राजभवन मुंबई येथे औपचारिक स्वागत केले. राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस या देखील यावेळी उपस्थित होत्या.

त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतली असे सांगून भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ किथ राऊली यांनी यावेळी केले. आज मुंबईत दहा प्रसिद्ध उद्योगपतींशी चर्चा झाल्याचे सांगून भारतीय उद्योजक त्रिनिदाद टोबॅगो येथे गुंतवणुकीबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारताकडून सहकार्य होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्रिनिदाद येथे क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दृष्टीने या भेटीत उद्योजकांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

त्रिनिदाद टोबॅगो पंतप्रधानांचे स्वागत करताना, त्रिनिदाद ही महान फलंदाज ब्रायन लाराची भूमी आहे तसेच ड्वेन ब्रावो, सुनील नरेन व कीरोन पोलार्ड हे त्रिनिदादचे क्रिकेटपटू भारतात लोकप्रिय असल्याचे राज्यपाल बैस यांनी त्यांना सांगितले.

भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देश वाटचाल करीत आहे, असे सांगून त्रिनिदाद टोबॅगो देशाने भारताशी कृषी, आरोग्यसेवा, औषधीनिर्माण, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये भागीदारीला चालना द्यावी असे राज्यपालांनी आवाहन केले.

त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील विद्यापीठांनी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य प्रस्थापित करावे अशीही अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी त्रिनिदाद- टोबॅगो शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राज्यपालांनी प्रीती भोजनाचे आयोजन केले.

यावेळी त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकाचे कार्य आणि वाहतूक मंत्री रोहन सिनॅनन व पामेला सिनॅनन, क्रीडा आणि समुदाय विकास मंत्री शम्फा कुडो – लुईस, त्रिनिदादचे भारतातील राजदूत डॉ रॉजर गोपॉल, प्रशासकीय सहयोगी, उच्चायुक्त कार्यालय शर्लिन रामसुंदर, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजशिष्टाचार अधिकारी किर्क फ्रँकोइस, माध्यम उप सचिव ॲबी ब्रेथवेट आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या वतीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, एअर वाईस मार्शल रजत मोहन, मे. जन. विक्रमदीप सिंह, रिअर ऍडमिरल मनीष चड्ढा, अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"Symbiosis Centre for Skill Development in Nagpur is organizing a free online webinar focusing on Graphic Design on May 18th

Fri May 17 , 2024
Nagpur :- “Symbiosis Centre for Skill Development in Nagpur is organizing a free online webinar focusing on Graphic Design on May 18th at 5 p.m. Those interested in graphic design and willing to participate in the online webinar can register for free by sending their name and number to the WhatsApp number provided below. The webinar will be conducted by […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com