भारतीय विज्ञान काँग्रेस – बाल वैज्ञानिक संमेलनाचे उद्घाटन

बालकांच्या वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान काँग्रेस कटीबद्ध – डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना

नागपुर, दि.4: बालकांमध्ये प्रचंड वैज्ञानिक जिज्ञासा आहे. आताची ही बालके उद्याची ‘यंग सायंटिफीक ब्रिगेड’ आहे. बालकांमधील जिज्ञासा आणि प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी केले. 

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्त राष्ट्रीय बाल वैज्ञानिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सक्सेना बोलत होत्या. ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतिश वाटे, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान कम्युनिकेशनचे प्रमुख डॉ.मनोरंजन मोहंती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे कुलगुरु डॅा.सुभाष चौधरी, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॅा.एस.रामकृष्णन, डॅा.अनुपकुमार जैन, डॅा.सुजित बॅनर्जी, राष्ट्रीय बाल वैज्ञानिक संमेलनाचे संयोजक डॅा.निशिकांत राऊत उपस्थित होते.

वैज्ञानिक संशोधन, पर्यावरण, उत्पादन यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेस काम करते आहे. बालकांमध्ये वैज्ञानिक संशोधनवृत्ती वाढीस लागली पाहिजे, त्यासाठी दरवर्षी केवळ बालकांसाठी राष्ट्रीय वैज्ञानिक संमेलन आयोजित केले जाते. तंत्रज्ञानविषयक तत्व समजून घेऊन ते विकसित करण्यासाठी बालकांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील नाविन्याचा शोध घेणे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जागृती घडविण्याचे काम भारतीय विज्ञान काँग्रेस करते आहे, असे डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी सांगितले.

डॉ.वाटे यांनी सांगितले की, या संमेलनातून बालकांना महान वैज्ञानिकांचे कार्य पाहण्याची संधी उपलब्ध होते. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी चांगले काम करण्याची जिज्ञासा देखील निर्माण होते. भविष्यात बालकांना देशासाठी विविध क्षेत्रात काम करण्याची संधी निर्माण होणार आहे. बालकांनी आत्मनिर्भर भारताचा भाग होऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या नाविन्यतेची चुणूक दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ.मनोरंजन मोहंती म्हणाले की, नाविन्यता कार्यक्रमामध्ये बालकांचा सहभाग महत्वाचा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक प्रयोगशाळांशी जिज्ञासू बालकांना जोडले जावे. बाल वैज्ञानिक संमेलन बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावण्यासाठी उपयुक्त आहे.

प्रास्ताविक कुलगुरु डॅा.सुभाष चौधरी यांनी केले. डॅा.रामकृष्णन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संमेलनानिमित्त बाल वैज्ञानिकांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचलन स्नेहल मुन यांनी तर आभारप्रदर्शन डॅा.निशिकांत राऊत यांनी केले. कार्यक्रमास बाल वैज्ञानिकांसह शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन  

संमेलनाच्या उद्घाटनानंतर बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतिश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. सांडपाण्याचा पुनर्वापर, गॅस गळतीची धोकासुचना देणारा प्रयोग, दृष्टीदोष सुधारण्यासाठी ॲप, पशुधन स्वच्छता, इमारत बांधकामावर ठिबक सिंचन प्रमाणे पाण्याचा नियंत्रित वापर, लाईफ सेफ्टी हेल्मेट वापर व गाडीचोरीपासून बचाव, गहू तांदळाच्या वेष्टनापासून विविध वस्तु निर्मिती यासारखे विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी मांडले आहेत.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय संपर्क कामगार संघ व सर्व कंत्राटदार व दुकानदरांची 5 जानेवारी रोजी पवारभवन येथे बैठक.

Wed Jan 4 , 2023
नागपूर :- राष्ट्रीय संपर्क कामगार संघ व सर्व कंत्राटदार व दुकानदार यांची पवार विद्यार्थी भवन, कुकडे ले आऊट, रामेश्वरी मेडिकलच्या मागे, चंद्रमणी गार्डन जवळ नागपूर येथे दिनांक ०५ जानेवारी २३ गुरूवारी दुपारी १:०० वाजता. बैठक आयोजित केली आहे, यामध्ये मीटिंग, कॉन्टॅक्टर दुकानदार ज्याला जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा त्याला त्याची समस्या मांडण्याचा पूर्ण अधिकार असेल, त्यानंतर युनियन विचार करेल की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!