– पुनीत सागर अभियाना अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, दूतावासाच्या अधिका-यांसह जहाजावरच्या कर्मचा-यांनी पट्टाया सागरी किनाऱ्यावर राबविला स्वच्छता उपक्रम
नवी दिल्ली :-भारताचे सागरी कौशल्य आणि वचनबद्धता अधिक प्रभावी करण्याच्या हेतूने सामायिक आव्हाने, विशेषत: सागरी प्रदूषणाला तोंड देण्यासाठी, भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) प्रदूषण-नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रहरी’ ने 20 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या चार दिवसांच्या भेटीच्या अंतिम दिवशी थायलंडमधील बँकॉक इथल्या क्लोंग टोई बंदर येथे सर्वसमावेशक प्रदूषण प्रतिसाद टेबल-टॉप सराव आणि प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. या सरावात थायलंडच्या सागरी अंमलबजावणी समन्वय केंद्र (MECC), सीमाशुल्क विभाग, सागरी विभाग, रॉयल नेव्ही, मत्स्य विभाग आणि इतर सरकारी अधिकारी सहभागी झाले होते.
या अभ्यासामध्ये भारतीय तटरक्षक दलाच्या सहकार्याने थायलंडच्या सागरी प्रदूषण प्रतिसाद आकस्मिक योजनेची रचना आणि चाचणीचा सरावात करण्यात आला. या सरावाच्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दलाने आपली प्रदूषण प्रतिसाद क्षमता आणि या क्षेत्राप्रती असलेली भारताची सामायिक वचनबद्धता सिद्ध केली.
आपल्या या भेटीदरम्यान, जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी (NCC) आणि भारतीय दूतावासातील प्रतिनिधींनी पट्टाया इथल्या सागरी किनाऱ्यावर स्वच्छता मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला. हा उपक्रम पुनीत सागर अभियानाचा एक भाग आहे, जो स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवताना, प्लास्टिक आणि इतर कचरा सामग्रीपासून समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या देशव्यापी मोहिमेचा भाग होता.
कमांडिंग ऑफिसर डीआयजी जीडी रतुरी यांनी थाई-एमईसीसी मुख्यालयात धोरणे आणि योजना अंमलबजावणी कार्यालयाचे महासंचालक रिअर ॲडमिरल विचनू थुपा-अँग यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात भारत आणि थायलंडमधील वाढत्या संबंधांवर चर्चा केली.
भारत-आसियान उपक्रमांतर्गत ‘समुद्र प्रहरी’ जहाजाची ही बँकॉक भेट भारतीय तटरक्षक दल आणि थायलंडच्या सागरी अंमलबजावणी समन्वय केंद्र यांच्यात सागरी क्षेत्रातील संबंध वाढवण्याच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, सागर (SAGAR) ( क्षेत्रातील सर्वांची सुरक्षा आणि विकास) या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने भारताला एक विश्वासार्ह सागरी भागीदार म्हणून अधोरेखित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.