नवी दिल्ली :- “भारताने 2 वर्षांत क्वांटम तंत्रज्ञान असलेल्या 40 पेक्षा जास्त स्टार्ट-अप्सची निर्मिती केली असून त्यापैकी काही जागतिक क्षमतेचे आहेत,” असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग राज्यमंत्री आणि कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाकांक्षी राष्ट्रीय क्वांटम मिशनवर लक्ष केंद्रित करण्याचे, तसेच क्वांटम तंत्रज्ञान आणि क्वांटम कम्युनिकेशनच्या विकासावर काम करण्याचे निर्देश दिले. क्वांटम तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत सध्या इतर राष्ट्रांच्या बरोबरीने कामगिरी करत आहे, असे ते म्हणाले. क्वांटम तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताला जागतिक नेतृत्व म्हणून प्रस्थापित करणे हे आपले ध्येय आणि स्वप्न असले पाहिजे, असे ते म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात स्टार्टअप्स आणि खाजगी क्षेत्राची भूमिका अधोरेखित करताना ‘QuNu लॅब्स’, या आयआयटी मद्रासने विकसित केलेल्या बंगलोर स्थित स्टार्टअपची यशोगाथा सामायिक केली, ज्याने क्वांटम तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा उत्पादनांच्या विकासासाठी तंत्रज्ञान विकास मंडळासोबत सामंजस्य करार केला आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “गेल्या 10 वर्षात बाह्य संशोधन आणि विकासात महिलांचा सहभाग दुपटीने वाढला आहे”. सरकारने गेल्या दशकात केलेल्या विशेष प्रयत्नांनंतर आणि महिला शास्त्रज्ञ आणि संशोधकांना फेलोशिप STEM कार्यक्रमाद्वारे प्रोत्साहन दिल्यामुळे महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यांनी अलीकडेच उद्घाटन केलेल्या ‘कॉमन फेलोशिप पोर्टल’चा संदर्भ देत ‘अर्ज करण्याची सुलभता’ अधोरेखित केली. ASPIRE योजनेअंतर्गत सुमारे 300 महिला शास्त्रज्ञांना सरकारकडून 3 वर्षांसाठी संशोधनपर अनुदान मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अंतराळ क्षेत्रासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात उत्तम कामगिरी करत भारत, 2014 पूर्वीच्या काही शेकडोवरून 2024 मध्ये 1.25 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आणि 110 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह ‘जगाची स्टार्टअप राजधानी’ बनत आहे, याबद्दल विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारीत 2015 मधील 81 व्या क्रमांकावरून 2023 मध्ये 40 व्या क्रमांकावर भारताने झेप घेतल्याचे डॉ. सिंह यांनी अधोरेखित केले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तळागाळातील जनतेला सशक्त करण्याचा आणि जीवन सुलभता उपलब्ध करून देण्याचा संकल्प, हेच आपल्या नवोन्मेषाचे उद्दिष्ट असले पाहिजे,” असे डॉ जितेंद्र सिंह यांनी तंत्रज्ञान विकास मंडळाच्या चमूला भविष्यातील कार्ययोजनेबद्दल प्रेरित करताना सांगितले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अनुकूल वातावरणामुळे भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ही सर्वोत्तम वेळ असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. केंद्र सरकारने 2016-2023 या काळात नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्स (NIDHI) मध्ये सुमारे 900 कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे, जी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवोदित उद्योजकांना सहाय्य करत आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी विद्यमान राष्ट्रीय भू-स्थानिक मिशन, इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल मिशनच्या प्रगतीचीही माहिती घेतली. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन संबंधी कायदा आणण्याचे सरकारचे प्रयत्न देखील त्यांनी अधोरेखित केले.
या बैठकीला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर; अतिरिक्त सचिव सुनील कुमार, भारताचे महासर्वेक्षक हितेश कुमार एस. मकवाना, डीएसटी अंतर्गत संस्थांचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.