संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– तृष्णा भागविण्यासाठी आंबे,उसाच्या रसासह लिंबुच्या सरबतला प्राधान्य
कामठी :-कामठी तालुक्यातील तापमानाचा पारा 39 अंशावर गेल्याने सूर्य आग ओकू लागला आहे.वाढत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे.दरम्यान उष्णतेच्या लहरी वाढणार असल्याने कामठी तालुका प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आला आहे.उन्हाचा पारा सद्यस्थितीत 40 अंशाच्या घरात स्थिरावला आहे त्यामुळे शरीराची लाही लाही होत आहे.शरीराची तृष्णा भागविण्यासाठी थंड पेयासह लिंबु पाणी,आंब्याच्या रसासह ,उसाचा ज्यूस ,सरबत ,फळांचे ज्यूस,रसदार फळे विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांचा या थंड पेयकडे कल वाढलेला आहे.तसेच चौकाचौकात शितपेयाची दुकाने थाटली असल्याने नागरिकाकडून दुपारच्या वेळी या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होताना दिसुन येत आहे.
तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून मे हिटचा तडाखा एप्रिल महिन्यातच जाणवत आहे.त्यामुळे नागरिक हे त्रस्त झाले आहेत.वृद्ध व बालकांना या उकाड्याचा सर्वात जास्त त्रास होत आहे.उष्णतेचे विकार चक्कर येणे,डोके दुखणे,तोंडास कोरड पडणे तसेच कितीही पाणी प्यायले तरी तृप्ती न होणे,उन्हामुळे आवाज खोल जाणे, घसा ओढवणे, जीभ खरखरने,थकवा येणे आदींचा त्रास होत आहे.शेतकऱ्यांचे रोजचे चलन म्हणून समजला जाणारा भाजीपाला लागवड आता कमी होऊ लागला आहे त्याचाच परिणाम किमतीवर होऊ लागला आहे.मालाची आवक सगळीकडेच कमी झाली आहे.पाण्याअभावी पिके शेतात होरपळत आहेत.
वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे तसेच कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी उन्हापासून संरक्षणाचे साहित्य वापरावे असे आवाहन कामठी तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.