नागपूर : नागपूर शहरातील वॉकर स्ट्रीटवर येणाऱ्या नागरिकांचे विविध भाव दर्शविणारे ‘स्टॅचू’ साकारलेल्या ‘वॉकर पॅराडाईज’चे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शुक्रवारी (ता.10) लोकार्पण झाले. याप्रसंगी माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर संदीप जोशी, जयप्रकाश गुप्ता, जयस्वाल निको चे संचालक रमेश जयस्वाल, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे, उपाध्यक्ष डॉ. कुंदर, सचिव निशांत गांधी, कोषाध्यक्ष अभिजित मुजुमदार, सदस्य म्हैसाळकर, दत्तात्रय गारवे, दिलीप चिंचमलातपुरे, कॅप्टन डॉ. लक्ष्मीकांत कलगजी, ऍड. राधिका बजाज, किशोर ठुटेजा, सुनील अग्रवाल, विजय तिवारी, योगेश बंड आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री निवास ‘रामगिरी’ पुढील मार्गावर (वॉकर स्ट्रीट) नागपूर महानगरपालिका, ग्रीन फाऊंडेशन, जयस्वाल निको ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वॉकर पॅराडाईज’ साकारण्यात आले आहे. शहरातील विविध भागातून ‘वॉकर स्ट्रीट’वर फिरायला येणाऱ्या नागपूरकरांचे भाव पुतळेरूपात साकारण्यात आले आहेत. सर्वाधिक नागरिक या मार्गावर ‘मॉर्निंग वॉक’साठी येत असल्याने ग्रीन फाऊंडेशनने येथे ‘वॉकर पॅराडाईज’ साकारण्याची संकल्पना मांडली. नागपूर महानगरपालिकेने जागेची उपलब्धता आणि जयस्वाल निको ग्रुपने पुतळे निर्मितीची जबाबदारी स्वीकारून या संकल्पनेला साथ दिली.
‘वॉकर पॅराडाईज’मध्ये शहरातील तरुणाई, ज्येष्ठ, चिमुकले, महिला या सर्वांचे भाव साकारले आहे. जॉगर, रनर, रिस्ट वॉकर यासह वजन कमी करण्यासाठी नियमित फिरायला येणारी महिला, श्वानाला घेऊन फिरणारी व्यक्ती, चिमुकलीला फिरायला घेऊन आलेली आई, नव्या युगातील तरुणी, तरुणांचा ग्रुप, काठीच्या आधाराने फिरणारे वृद्ध असे 11 प्रकारचे पुतळे येथे उभारण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संकल्पनेचे कौतुक करीत कार्यावर समाधान व्यक्त केले. ग्रीन फाऊंडेशनतर्फे अनिल अग्रवाल, निशांत गांधी यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.