– मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ
मुंबई :- ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याचे, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज सह्याद्री अतिथी गृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.500/- चा भत्ता आता रु.1000/- इतका करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.