Ø दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी मुख्य समारोह
Ø विभागातून 142 स्वयंसेवकांचा समावेश
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात विभागातून 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांसोबत पाठविण्यात येणार आहेत. तत्पुर्वी मुंबईच्या आजाद मैदान येथे राज्यातील सर्व अमृत कलशांचे पूजन होइल व त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. अमृत कलश सन्मानपूर्वक पाठविण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिल्या.
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानासंदर्भात विभागीय आयुक्तांनी आज आढावा घेतला. उपायुक्त कमलकिशोर फुटाणे व प्रदीप कुळकर्णी, नगरप्रशासनचे मनोजकुमार शाह, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण उपस्थित होते. तसेच विभागीतील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित होते.
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानामध्ये ‘अमृत कलशच्या माध्यमातून विभागात एकत्र केलेली माती दिल्ली येथील कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या ‘अमृत वाटिकेत’ अर्पण केली जाईल. यासाठी विभागातील तालुक्यातून 63, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचे प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सहा व नागपूर व चंद्रपूर महानगरपालीकेचे एक-एक असे 71 अमृत कलश 142 स्वयंसेवकांमार्फत रवाना करण्यात येणार आहेत. राज्यातील सर्व अमृत कलश 27 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे पाठविण्यात येतील. दिल्ली येथे 31 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्य समारंभ होणार आहे.
प्रत्येक नागरिकाचा सहभाग
अमृत यात्रेसाठी 16 लाख 58 हजार कुटूंबाकडून अमृत कलशात माती संकलीत करण्यात आली. यात नागपूर महानगरपालीकेतील 10 लाख 1351 कुटूंब, चंद्रपूर महानगरपालीका 35 हजार 243 कुटूंब, विभागातील 77 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील 3 लाख 66 हजार 108 कुटूंब व 63 तालुक्यातील 16 लाख 58 हजार कुटूंबांनी सहभाग नोंदविला.
अमृत कलश अभियानासाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांच्या प्रवास व निवास व्यवस्थेचाही बिदरी यांनी आढावा घेतला.