– विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना वाव देणारा उत्सव
नागपूर :- नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ चा शुभारंभ बुधवारी २२ जानेवारी २०२५ राजी दुर्गानगर मनपा शाळेमध्ये संपन्न झाला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने हा उत्सव राबविण्यात येत आहे. बुधवारी (ता. २२) मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्या हस्ते शिक्षणोत्सवाचे उद्घाटन झाले.
शिक्षणोत्सव हा नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या बौद्धिक, शारीरिक, आणि सांस्कृतिक विकासासाठी आयोजित केला जात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा, सांस्कृतिक, बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याची सुरुवात बुधवारी २२ जानेवारी ला चित्रकला आणि हस्तकला स्पर्धेपासून झाली. या स्पर्धेमध्ये ५० पेक्षा अधिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले.
या प्रसंगी शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. अगदी कमी कालावधीत देखील विद्यार्थी स्वतःला तयार करतात हे, अभिनंदनास पात्र आहेत, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी शाळा निरीक्षक प्रशांत टेंभुर्णे, जयवंत पिट्टूले, अंजुम आरा, रजिया शाहीन, शिक्षणोत्सव कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक अनिता भोतमांगे, बौद्धिक स्पर्धा समन्वयक कृष्णा उजवणे, श्रीकांत गडकरी, चित्रकला स्पर्धा समन्वयक उपस्थित होते. शिक्षणोत्सव कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणार आहे.