· जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १२ व १३ ऑगस्ट रोजी आयोजन
· कुंजरु, पाथरी, करटोली, कुरडु रानभाज्यांसह मिळणार हंगामी फळे
नागपूर :- औषधी गुणतत्वे असणारा रानमेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हावा व शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी, याउद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय रानमहोत्सवाचे उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सर्वसामान्यांना रानमेवा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन १२ व १३ ऑगस्ट २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय आयुक्त यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या महोत्सवासाठी २० स्टॉल्सची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालिका डॉ. अर्चना कडू यांनी दिली आहे. केना, कुंजरु, खापरखुटी, पाथरी, कपाळफोडी, टाकळा/तरोटा, मायाळू भाजी, कुरडुची भाजी, शेवळा, करटोली, काटेमाठ, हादगा, दिंडा भाजी, शेवगा, अघाडा, कमळून भाजी, आंबाडी भाजी, तसेच हंगामी फळे या महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.