नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नवीन वर्षात होणा-या ५व्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने दक्षिण-पश्चिम नागपूर कार्यालयाचे मंगळवारी (ता.१३) उद्घाटन झाले. विवेकानंद नगर येथील इन्डोअर स्टेडियममध्ये नागपूर नागरीक सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या दक्षिण-पश्चिम नागपूर कार्यालयाचे उद्घाटन केले. तर महाल येथील चिटणीस पार्क येथील कार्यालयाचे आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
दोन्ही कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. चिटणीस पार्क येथील समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार गिरीश व्यास व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह समितीचे सहसंयोजक व मध्य नागपूर कार्यालय प्रमुख डॉ. विवेक अवसरे उपस्थित होते. विवेकानंद नगर इन्डोअर स्टेडियममधील समारंभाला खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे दक्षिण-पश्चिम नागपूर कार्यालय प्रमुख रमेश भंडारी यांची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी साजरा होणा-या खासदार क्रीडा महोत्सवाचे पाचवे पर्व लवकरच सुरू होत आहे. ८ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३ या कालावधी मध्ये पाचवे खासदार क्रीडा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंना या महोत्सवात सहभागी होता यावे, सहभागी होताना आवश्यक नोंदणी करण्यासाठी सुलभता प्रदान व्हावी याउद्देशाने विधानसभा मतदार संघनिहाय कार्यालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या माध्यमातून आणखी मोठ्या संख्येने खेळाडू या महोत्सवात सहभागी होउन पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नागपूर शहराचे नाव लौकीक करतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.