मुंबई :-पुणे छावणीत सुरु करण्यात आलेल्या प्रकृती स्वास्थसुविधा केंद्राचे उद्घाटन लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह , एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम यांच्या हस्ते करण्यात आले.भारतीय सशस्त्र दलातील जवान, अधिकारी त्यांचे अवलंबीत कुटुंब सदस्य आणि माजी सैनिकांसाठी ,पर्यायी उपचारांद्वारे सर्वांगीण आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. भारतीय लष्कराचा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
या केंद्राच्या कार्यक्षम कारभारासाठी दक्षिण कमांड आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्राध्यापक डॉ. सत्या लक्ष्मी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले आणि वैद्यकीय उपचारांसाठी एक प्रभावी पर्याय म्हणून निसर्गोपचाराच्या महत्त्वावर भर दिला.ही सुविधा निरामयतेसाठी निसर्गोपचार, आयुर्वेदिक वैद्यकीय सल्ला, सेंद्रिय उत्पादने यांसारख्या विविध प्रकारच्या सेवा प्रदान करेल आणि 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे त्याअनुषंगाने भरडधान्य उत्पादनांसाठी विशेष काउंटरसह प्रधानमंत्री जन औषधी कार्यक्रमांतर्गत अनुदानित दरात जेनेरिक औषधेही या केंद्रात उपलब्ध असणार आहेत.
रमामणी अय्यंगार स्मृती योग संस्थेच्या अभिलता अय्यंगार या देखील उद्घाटन समारंभाला उपस्थित होत्या आणि आपल्या प्राचीन पारंपरिक उपचार पद्धतीद्वारे सर्वांगीण आरोग्यासाठी भारतीय लष्कराने उदात्त हेतूने केलेल्या या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. आरोग्य आणि निरामयतेसाठी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असणारे हे प्रकृती केंद्र हे सर्व दलातील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचार्ऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.