– पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाचा पुढाकार
– रामनगर मैदानात पारंपारिक मूर्तिकारांना विक्रीची जागा उपलब्ध
नागपूर :- पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पारंपारिक मूर्तीकारांना गणेश मूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पारंपारिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ यांच्या सहकार्याने धरमपेठ झोन येथील रामनगर मैदान येथे मातीच्या मूर्ती विक्री केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या हस्ते शनिवार(ता. १६) रोजी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, पारंपारिक मूर्तिकार संघाचे सुरेश पाठक, राजकुमार गुप्ता यांच्यासह मूर्तिकार व नागरिक उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी स्वतः मातीच्या मूर्तीची विक्री करीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता पुढाकार घेतला. तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्तीची स्थापना करावी असे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी उपस्थित मूर्तिकारांशी चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिका आग्रही आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार यावर्षी पी.ओ.पी. मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच नागरिकांना मातीच्या मूर्ती सहज उपलब्ध व्हाव्यात. याकरिता धरमपेठ झोन येथील रामनगर मैदानात पारंपारिक मूर्तिकारांना विक्रीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सव म्हटलं तर सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते असे असताना नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, तसेच मातीच्या मूर्तीची स्थापना करावी असे आवाहन मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी यावेळी केले.