· २२ राज्यांचा सहभाग
नागपूर :- अखिल भारतीय नागरी सेवा संगीत, नृत्य व लघुनाट्य स्पर्धा २०२३-२४ चे उद्घाटन आज वसंतराव देशपांडे सभागृह येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने सचिवालय जिमखान्यामार्फत आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत २२ राज्यासह ५६५ स्पर्धक सहभागी झाले आहेत. 2 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत दररोज संगीत, नृत्य, लघुनाट्य यासह संगीत कला प्रकारातील हिंदुस्तानी शास्त्रीय (गायन) हिंदुस्थानी उपशास्त्रीय (गायन) कर्नाटकी शास्त्रीय (संगीत) कर्नाटकी उपशास्त्रीय (गायन) पाश्चात्य संगीत (गायन) लोकसंगीत गायन (एकल) आणि लोकसंगीत समूह गायन सादर करण्यात येणार आहे.
संगीत कला प्रकारातील शास्त्रीय नृत्य (एकल) पाश्चात्य संगीत (गायन) लोकसंगीत (एकल) लोकनृत्य समूह सादर केली जाईल. जनतेचा सहभाग लक्षात घेता वारकरी संप्रदायातील दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्यावतीने महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनानंतर ‘जय महाराष्ट्र’ या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाला मंगल नाखवा, सहाय्यक स्पर्धा सचिव मारुती कवालदार, सभापती अनंत शेटे, उपसभापती तुषार हिरेकर, मानद सचिव अरविंद शेट्टी मानद खजिनदार सती सोनवणे, मानद सहसचिव सुनील आगरकर व मानद सहसचिव मकरंद गयावळ यांची उपस्थिती होती.
दिनांक 2 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय नागरी सेवा संगीत नृत्य व लघुनाटय स्पर्धेचा समारोप सायंकाळी सहा वाजता होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.
श्रीमती बिदरी यांच्या हस्ते पंथसंचलनामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या हरियाणा, तर व्दितीय क्रमांक छत्तीसगड राज्यातील स्पर्धेकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित स्पर्धकांना मानद सचिव अरविंद शेट्टी यांनी शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगल नाखवा यांनी केले. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.