संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या 27 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 18 डिसेंबर ला होणार असून 28 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल केल्या जाणार आहे तर या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार असून सरपंच पदासह सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी संबंधित गावात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे तसेच राजकिय हालचालींना वेग आल्याने गावांतर्गत निवडणूक पूर्व वातावरण तापू लागले आहेे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या येरखेडा ग्रामपंचायतच्या थेट जनतेतून सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी गावातील राजकीय वातावरण तापू लागले असून थेट जनतेतून सरपंच पदासाठी होणारी निवडणूक ही चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. तर या स्थितीत कांग्रेसचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी दत्तक घेतलेल्या कामठी विधानसभा मतदार संघात येणारी ही येरखेडा ग्राा. प. निवडणूक चुरशीची होणार असली तरी सत्ता काबीज करण्याच्या स्पर्धेत असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याने संबंधित गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून होणार असताना ग्रामपंचायत सदस्यपदासह सरपंच पदाच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी झाली आहे.जनमताचा कौल घेण्यात येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून तालुका राजकारणात राजकीय वर्चस्व राखले जात असल्याने या निवडणुकीसाठी कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपा, शिवसेना,वंचित बहुजन आघाडी ,एमआय एमआयएम ,आदी पक्षाची मंडळी ही प्रत्यक्षरीत्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सक्रिय झाली असून होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायत वर्चस्व राखण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या मंडळीसाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. सरपंच पदासाठी सक्षम व योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी सर्वच पक्षाचे नेते मंडळी कामाला लागली आहे त्यानुसार येरखेडा ग्रा प चे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्याने कांग्रेसप्रणित उमेदवार म्हणून माजी जी. प. सदस्य सरीतातरंगारी , माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील ,ओमप्रकाश कुरील, यांचे नाव चर्चित असले तरी उमेदवारी कुणाला मिळणार हे अजुनही अनुत्तरित आहे तर भाजप प्रणित उमेदवार म्हणून ग्रा प सदस्य सुमेध दुपारे, राजकीरण बर्वे, नरेश मोहबे,देशमुख यांचे नाव चर्चित आहे तसेच इतरही पक्ष ऍक्शन मोड मध्ये आले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत सरपंच पदी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी आतापासूनच उमेदवाराचा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून होत असली तरी सर्वांगीण विकास साधला जावा या हेतूने ग्रामपंचायत सदस्य पदालाही महत्व आहे .त्यामुळे सरपंच पदाबरोबर ग्रामपंचायत सदस्य पदाचे होणारी ही निवडणूक पक्षांतर्गत गावातील दोन गटांतर्गत काट्याच्या लढतीचे होणार आहे.