– माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम
नागपूर :- नियमित वृत्तपत्रीय लिखाणामध्ये प्रमाणलेखनाचा वापर व्हावा, वारंवार होणाऱ्या चुका व चुकीच्या शब्दांचा वापर टळावा. वृत्तलेखनाचा दर्जा वाढवा यासाठी शुद्धलेखन व योग्य शब्दांच्या वापरासंदर्भातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माध्यम प्रतिनिधींच्या दैनंदिन लिखाणात सुधारणा व्हाव्यात, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज ‘शुद्धलेखन’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाषा व प्रमाणभाषेसंदर्भातील तज्ज्ञ,सुप्रसिद्ध मुद्रितशोधक, परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ महाविद्यालयातील प्रा. दीपक रंगारी यांनी यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. उपायुक्त (महसूल) दीपाली मोतीयेळे, उपायुक्त (विकास) कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (आस्थापना) विवेक इलमे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर, मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वऱ्हाडे तसेच जिल्ह्यातील पत्रकार या कार्यशाळेला उपस्थित होते.
भाषासौंदर्य व वाक्याचा आशय जपण्यासाठी शुद्धलेखन महत्त्वाचे आहे. प्रमाणभाषेसाठी वर्तमानपत्रे व दर्जेदार पुस्तकांकडे पाहिले जाते. त्यामुळे पत्रकार, लेखकांनी ‘शब्द हेच शस्त्र ’ या उक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन निर्दोष लिखाणावर भर देण्याचे मत दीपाली मोतीयेळे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. कमलकिशोर फुटाणे यांनी बोलीभाषेत व प्रमाणभाषेत वाक्याचा योग्य अर्थबोध होण्यासाठी व्याकरणाच्या चुका टाळण्याचे तर विवेक इलमे यांनी प्राथमिक शिक्षणापासून मुलांच्या शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याचे सांगितले.
कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक दीपक रंगारी यांनी यावेळी पत्रकारांना शुद्धलेखनाचे नियम समजावले. शुद्धलेखन म्हणजेच प्रमाणलेखन होय. ते कसे लिहावे, त्याचे काय नियम आहेत हे दीपक रंगारी यांनी सांगितले. या कार्यशाळेमध्ये त्यांनी वृत्तपत्रातील भाषेच्या अनेक गमतीजमती सांगितल्या. कुठले शब्द रूढ आहेत, तत्सम आणि तद्भव यात काय फरक आहे हेसुद्धा त्यांनी फळ्यावर समजावून सांगितले. मराठी शब्दकोशाचा वापर न करता किंवा व्याकरण न वाचता बातमी लिहिणे किती घातक असते हे त्यांनी मोठ्या मनोरंजकतेने सांगितले. वर्णांचे उच्चार, अनुनासिक म्हणजे काय, ते जर समजून घेतले नाही तर अनुस्वार देताना काय गोंधळ होतो. अनेक शब्द असे आहेत की ते चूक असूनही आपण बरोबर आहेत असे समजून लिहितो. त्यांनी ते सप्रमाण लिहून दाखवले. शब्दयोगी अव्यय, विभक्ती प्रत्यय यांचा वापर केल्यानंतर शब्दात कसा बदल होतो हेही त्यांनी सांगितले. मराठी शब्दकोश आणि मराठी व्याकरण यांचा नीट अभ्यास केला पाहिजे. शुद्धलेखनासाठी शब्दकोश व मराठी प्रमाण-लेखनकोश नियमित सोबत बाळगण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. अनिल गडेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सुभाष वऱ्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी शहर व ग्रामीण भागातील माध्यम प्रतिनिधी, माहिती विभाग तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदविला.