Ø आपदा मित्र प्रशिक्षणाच्या तिसऱ्या बॅचचे उद्घाटन
नागपूर : आपत्तीच्या वेळी आत्मविश्वास तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा तो स्वतःची सुरक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतो , तेव्हाच तो दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो, असे जी .एस. सैनी यांनी उद्घाटनपर भाषणातून सांगितले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यातील 500 युवकांना आपदा मित्र या आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येत आहे. पाच बॅचमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार असून तिसऱ्या बॅचचे उद्घाटन नॅशनल फायर सर्विसेस कॉलेजचे माजी संचालक जी. एस. सैनी व्हीएसएम यांच्या हस्ते संपन्न झाले. या बारा दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये एनडीआरएफ, एस. डी. आर एफ., होमगार्ड, रेड क्रॉस सोसायटी त्याचप्रमाणे शरीर विज्ञान, वॉटर सेफ्टी अशा विविध विषयांचे तज्ञामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सैनी पुढे म्हणाले की, व्यक्तीने कुठलीही आपत्ती आल्यानंतर घाबरू नये, कारण एक व्यक्ती घाबरल्यानंतर तो चुका करतो आणि त्यातूनच तो आपली सुरक्षा योग्यपणे करू शकत नाही. आपदा व्यवस्थापन हे केवळ व्यक्तीपुरतेच मर्यादित नसून समाजाच्या सुरक्षितेच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची आपदा मित्र या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नागपूर एक जिल्हा असून आतापर्यंत 220 चे जवळपास युवकांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. युवकांनी प्रशिक्षणानंतर स्वतःच्या सुरक्षेसोबतच समाजाच्या सुरक्षेसाठी तत्पर राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मत मांडले.
यावेळी महाराष्ट्र शासनाचे माजी क्रीडा सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे उपस्थित होते. मान्यवरांचे आभार नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश चौधरी यांनी केले.