– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘चांगल्या कामांत सुधीर मुनगंटीवार नेहमी पुढे’
– गायत्री परिवारतर्फे मुंबईत दिव्य अखंड दीप शताब्दी सोहळा
चंद्रपूर :- गायत्री परिवारातर्फे आज प्रज्वलित करण्यात आलेल्या दिव्यांच्या उजेडाने आपल्या आयुष्यातील अंधःकार निश्चितच नाहीसा होईल, असा मला विश्वास आहे. मनामध्ये रोज होणाऱ्या राम आणि रावणाच्या युद्धात केवळ रामच विजयी झाला पाहिजे ही गायत्री परिवाराची शिकवण राष्ट्रनिर्माणासाठी कायमच लाभदायक ठरली आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुंबई येथील मुलूंडमध्ये गायत्री परिवारच्या वतीने दिव्य अखंड दीप महायज्ञ तसेच दिव्य ज्योती कलश पूजनचे आयोजन करण्यात आले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. चिन्मय पंड्या, आमदार मिहिर कोटेचा आदिंची उपस्थिती होती.
प्रभू रामाने रावणाशी एकदा युद्ध केले. पण आज या समाजातील प्रत्येकाच्या मनात दररोज राम आणि रावण दोघेही आहेत. त्यांच्यात रोज युद्ध होते. आज आपल्या मनातील राम आणि रावणाच्या युद्धात रामच जिंकला पाहिजे. गायत्री परिवार हेच शिकवतो, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘संपूर्ण जग जिंकणाऱ्या सिकंदरने सांगितले होते की, माझा मृत्यू होईल तेव्हा कफन पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा. लोकांना समजू द्या, बघू द्या की, ज्या सिकंदराने जग जिंकलं, तोही रिकाम्या हाताने जात आहे. पण ते विदेशी ज्ञान आहे. आपले ज्ञान त्यापेक्षाही व्यापक आहे. ते शिकवतं की शरीर नष्ट होणारे वस्त्र आहे. आत्मा अमर आहे. आत्मा मरत नाही, जळत नाही, कापला जात नाही. आत्मा कधी रिकाम्या हातानी येत नाही आणि रिकाम्या हाताने जातही नाही. आत्मा मागच्या जन्माचे संस्कार घेऊन येतो. पुढच्या जन्मात हेच संस्कार घेऊन जातो.’ धन शेवटच्या श्वासापर्यंत कामी येईल. पण धर्माचा संस्कार पुढच्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून कामी येईल, असेही विचार आमदार मुनगंटीवार यांनी मांडले.
मनाच्या समाधानासाठी रामराज्य
शाळेत शिकत असताना शिक्षक सांगायचे की, रामराज्य आले पाहिजे. महात्मा गांधीजीही सांगायचे की, रामराज्य आले पाहिजे. तेव्हा मला प्रश्न पडला की, पिझा हट, आजच विज्ञान, संगणक हा झगमगाट तर तेव्हा नव्हता. मग कशाला हवे रामराज्य? हाच प्रश्न मी शिक्षकांना विचारला की रामराज्य कशाला? तेव्हा शिक्षक म्हणाले, झगमगाट हा वरवरच्या समाधानासाठी आहे. पण मनाच्या समाधानासाठी रामराज्यच आवश्यक आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
चांगल्या कामात सुधीर मुनगंटीवार कायम पुढे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील गडकिल्ले, मंदिरांच्या संवर्धनात आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मोठे काम केले आहे. मागच्या वर्षीही नवी मुंबईत अश्वमेध यज्ञाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सरकारच्यावतीने आम्हीही योगदान दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी तेव्हाही हिरीरीने सहभाग घेतला आणि भव्यदिव्य अश्वमेध यज्ञ आयोजित केला. त्याचे कर्ताधर्ता आमचे सुधीरभाऊ होते. चांगल्या कामांत ते नेहमी पुढे असतात, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.