संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
-मात्र अनेक घटनात आरोपींचाच पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही
-मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची खंत
कामठी – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची 7 फेब्रुवारी २०२३ रोजी निर्घृण हत्त्या झाली.. एक ठाम भूमिका घेत रिफायनरी विरोधात आवाज उठविला बद्दल त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला.. गाडी खाली चिरडून अत्यंत अमानुषपणे शशिकांतची हत्त्या केली गेली.. या घटनेनं महाराष्ट्र ढवळून निघाला.. मात्र शशिकांत वारिशे हा पहिला पत्रकार नाही की, ज्याचा आवाज कायमचा बंद केला गेला.. गेल्या २५ – ३० वर्षांची आकडेवारी परिषदेकडे उपलब्ध असून त्यानुसार यापुर्वी महाराष्ट्रात २१ पत्रकारांना निर्दयपणे संपवण्यात आले.. शशिकांत भाग्यवान असा की, मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, संघटना एकत्र आल्या .. आवाज उठविला.. मग आरोपी पकडला गेला.. मात्र या पुर्वीच्या अनेक घटनात आरोपींचाच पत्ता लागला नाही.. आरोपींना शिक्षा झाल्याचं एकही उदाहरण नाही.. महाराष्ट्रात ज्या पत्रकारांच्या हत्येचा विशेष चर्चा झाली त्या अकरा पत्रकारांच्या हत्तेची माहिती पुढं दिली आहे..
ए. के. नारायण- साप्ताहिक ब्लिट्झचे ए. के. नारायण यांची आजच्या पिढीला माहिती असण्याचं कारण नाही.. एक निर्भीड, लढाऊ पत्रकार अशी त्यांची ओळख होती.. उल्हासनगर मधील राजकारणी आणि अंडरवर्ल्डच्या संबंधाबाबत ते तेव्हा सातत्यानं लिहायचे.. त्यातून त्यांची हत्त्या झाली.. हल्लेखोरांनी क्रौर्याची एवढी सीमा गाठली की नारायण यांच्या शरिराचे दोन तुकडे केले .. ते दोन पेटयात घातले आणि या पेट्या त्यांच्या घरासमोर नेऊन ठेवल्या.. पत्रकारांवर दहशत बसविण्याचा हा प्रयत्न होता.. १९८२ मधील या घटनेचा आरोपी पकडला गेला पण मास्टरमाईंड कधी समोर आले नाहीत
अरविंद कराडकर पाचगणी – तरूण भारतचे पाचगणी येथील पत्रकार अरविंद कराडकर यांची निर्घृण हत्या झाली.. कराडकर यांच्या बातम्यांमुळे काही स्थानिक राजकारण्यांचे हितसंबंध दुखावले गेले.. त्यातून हा प्रकार घडल्याचे तेव्हा सांगितले जात होते…. तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.. १९८५ ची ही घटना आहे.. …
इक्बाल नातिक- १९८८ मध्ये उर्दू पत्रकार इक्बाल नातिकची पठाण गँंगने हत्त्या केल्याची तेव्हा चर्चा होता.. इक्बाल दाऊद गँगला आपली माहिती देत आहे या संशयातून विरोधी गँगने ही हत्त्या केली
जितेंद्र कीर- वसईतील “नरवीर चिमाजी” या दैनिकात काम करणारया जितेंद्र कीर यांची निर्घृण हत्त्या केली गेली.. वसईतील गुंडगिरीच्या विरोधात कीर सातत्यानं लिखाण करायचे.. त्यातून ही हत्त्या झाली .. जितेंद्रला उकळत्या डांबरात टाकण्यात आल्याची चर्चा तेव्हा होती.. आरोपीच काय जितेंद्रचा मृतदेह देखील सापडला नाही..
सुरेश खानोलकर- क्राईम मॅगझिन “खतरनाक” चे पत्रकार सुरेश खानोलकर यांच्यावर काही गुंडांनी गोळ्या घातल्या.. त्यातील एक गोळी शरीरात आरपार गेली.. ती डॉक्टरांना बाहेर काढता आली नाही.. पाच महिन्यानंतर सेप्टीक झाले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला..
किसनलाल निरबाण- अकोला येथून प्रसिध्द होणारया मातृभूमी दैनिकाचे वाशिम प्रतिनिधी किसनलाल निरबाण यांची १५ जून १९९७ रोजी हत्त्या केली गेली.. ते गच्चीवर झोपलेले असताना मारेकरयांनी धारदार शस्त्रांनी त्यांनी हत्त्या केली.. नेहमी प्रमाणे या घटनेतही सत्य बाहेर आले नाही..
परमार- परमार नावाच्या क्राईम रिपोर्टची हत्त्या केली गेली.. तो अंडरवर्ल्डशी संबंधीत बातम्या द्यायचा.. यातूनच त्याचा आवाज बंद केला गेला..
अनिल चिटणीस- अलिबाग येथून प्रसिद्ध होणारया ठिणगी या साप्ताहिकाचे संपादक अनिल चिटणीस यांची हत्या केली गेली.. १९९९ मध्ये राजकीय वैमनस्यातून ही हत्त्या झाली.. सबळ पुराव्या अभावी सर्व आरोपी निर्दोष सुटले..
अरूण नारायण दिकाते- तरूण भारतचे पत्रकार अरूण नारायण दिकाते यांना ८ जून २००६ रोजी नागपूर जवळ टाकळघाट येथे दगडाने ठेचून ठार करण्यात आले.. अगोदर दिकाते यांचं अपहरण केलं गेलं.. नागपूर – वर्धा मार्गावर त्यांच्यावर दगडांचा मारा करण्यात आला.. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण १० जून रोजी त्यांचं निधन झालं.. या प्रकरणाचा शोध लागला नाही..
ज्योतिर्मय डे- मुंबईतील मीड – डे या सायं दैनिकाचे क्राईम एडिटर जे. डे. यांची ११ जून २०११ रोजी हत्त्या झाली.. दिवसा ढवळया त्यांच्यावर पवई परिसरात पाच गोळ्या झाडण्यात आल्या.. ही अलिकडची घटना सर्वज्ञात आहे.. अंडरवर्ल्डच्या वादातून ही हत्या झाल्याची चर्चा तेव्हा होती…
शशिकांत वारिशे- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची निर्दयपणे हत्त्या करण्यात आली.. ७ फेब्रुवारी २०२३ ची ही घटना.. शशिकातने नियोजित रिफायनरीला विरोध करणारी भूमिका घेतली होती.. त्यामुळे त्यांचा आवाज कायमस्वरूपी बंद केला गेला.. या प्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर नावाच्या भूमाफियाला अटक करण्यात आली आहे.. मात्र या घटनेतील मास्टरमाईंड अजून समोर आले नाहीत…