मुंबई : धुळे जिल्ह्यातील गावांमध्ये जलजीवन मिशन मार्फत पाणीपुरवठा करण्यात येत असून, सौरऊर्जेचे पंपही या योजनेअंतर्गत बसविण्यात येतात. स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सौरऊर्जेचे पंप बसवून कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील पाणीपुरवठा समस्येबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील बोलत होते.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण नसल्याने त्या पुनर्रुज्जीवीत करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र जलजीवन मिशन योजनेमार्फत गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या अंतर्गत सौरऊर्जा पंपही लावण्यात येतात. स्थानिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास सौरऊर्जा पंपाच्या माध्यमातून पाण्याची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येतील असेही श्री. पाटील यांनी सांगितले.