कोविडमध्ये पती गमावलेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ दया – जिल्हाधिकारी आर.विमला

–  जिल्हा कृती दल व मिशन वात्सल्य योजनेचा आढावा

–  पोक्सोअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्याचे आवाहन

नागपूर, दि. 21: मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्ह्यात नागपूरसह तालुकास्तरावर अशा चौदा समित्यांची स्थापना  करण्यात आली असून त्याद्वारे कोविड महामारीत पती गमावलेल्या महिलांना  शासनातर्फे लाभ देण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, त्यांचा लाभ विधवा महिलांना आधार देण्यासाठी तालुका  बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी  तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले आहेत.  त्यासोबतच  पोक्सोअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कोविड महामारीच्या लाटेत  एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना व विधवा महिलांना आधार देण्यासाठी मिशन वात्सल्य योजना तयार करण्यात आली आहे. भांबावलेल्या मुलांना सहकार्य करुन मदत करणे गरजेचे आहे. बालकांना व महिलांना सहकार्य, समुपदेशन व त्यांना विविध योजनाची माहिती देवून त्यांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या 75  अधिकाऱ्यांनी  प्रत्येकी  एका बालकाच्या पालकत्वाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृतीदल व मिशन वात्सल्य योजनाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, सदस्या सुरेखा बोरकुटे, पोलीस निरीक्षक श्री. निकम, आरोग्य विभागाच्या डॉ. श्रीमती मेश्राम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या  कांचन वाघ, सुजाता आगरकर, जिल्हा महिला व    बाल विकास अधिकारी डॉ. अपर्णा कोल्हे,  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण तसेच तालुका बाल प्रकल्प अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

दोन्ही पालक गमावलेल्या 75 बालकांपैकी  52 शासनातर्फे 5 लाखाचे सानुग्रह अनुदान त्यांचे खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यासोबतच पी.एम. केअर मधून 10 लाखाची मदत लवकरच त्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी पी. एम. केअर पोर्टलवर दोन्ही पालक गमावेलेले व एक पालक गमावलेले असे 161 बालकांची नोंदणी करण्यात आली आहे. सर्व तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तालुकास्तरावर आठवड्यातून एकदा बैठक घेवून नियमित आढावा घ्यावा व अहवाल तत्काळ सादर करावा, अशा सूचना विमला आर. यांनी दिल्या.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे मालमत्तेविषयी प्रकरणात मार्गदर्शन करण्यात येत आहे. 161 बालकांना शुल्क माफ प्रमाणपत्र देण्यात आले असून खाजगी शाळांबाबत शिक्षण विभागातर्फे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 63 अनाथ प्रमाणपत्र देण्यात  आले बालकांना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 3 वर्षाखालील बालकांचे रहिवासी  प्रमाणपत्र देण्यासाठी  प्राधान्याने कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड महामारीतील पती गमावलेल्या  महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मदत देण्यात आली असून कौशल्य विभागातर्फे त्यांना प्रशिक्षण देवून रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जन्म-मृत्यु दाखला आदी वाटप करण्यात आले आहे. यासह अजूनही जिल्ह्यात जे बालक आहेत त्यांचा शोध घेवून त्यांच्या पाल्यांचे समुपदेशन करुन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सामाजिक तपासणी अहवाल तयार करणे चालू आहे. जिल्हा कृती दलाअंतर्गत शिक्षण विभागाद्वारे मुलांच्या फिबाबत शाळांना निर्देश देण्यात आले असून महिलांना कौशल्य  विकास विभागातर्फे प्रशिक्षण देण्याची तयारी करण्यात येत असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी सांगितले.

या बैठकीस  महिला बाल विकास विभागाचे अधिकारी, जिल्हा कृती दल समितीचे सर्व सदस्य व मिशन वात्सल्य समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तत्काळ पाठवा

Tue Dec 21 , 2021
  नागपूर दि. 21 : मागीलवर्षातील  फेब्रुवारी व मार्च 2021 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी   करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापकांनी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे. परीक्षेचा निकाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com