मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : विदर्भ व मराठवाडा या मागास भागाच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

            ‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

            आमदार  चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, प्रवीण दटके, मोहन मते, टेकचंद सावरकर, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी यावेळी उपस्थित होते.

            महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याचा संकल्प असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या मागास भागांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच सिंचन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रासाठी असलेली वीज दर सवलत तसेच वैधानिक विकास मंडळे  पुनर्जीवित करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच शेती आणि शेतकरी यांचा अधिक शाश्वत विकास करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान, सौर कृषिपंप यासारख्या योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            निसर्गाच्या कोपामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, त्यापासून शेती व शेतकरी वाचविण्यासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे. त्यासोबतच मानवी चुकांमुळे पूर परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल. आवश्यक तेथे वेगाने मदत पोहोचविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे राज्याच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जनतेला मदत करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यावेळी म्हाणाले.

            राज्याच्या काही भागात पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाल्यास पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी सांगितले.

            राज्याचा सर्वांगीण विकास करताना बारा बलुतेदार समुहातील शेवटच्या घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करुनच परिपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात येईल. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे, याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर केले.

            विदर्भ, मराठवाडा या मागास भागांच्या विकासाला पोषक असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग देवून निश्चित कालावधी हे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच मिहान प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेयात येईल. विदर्भातील 89 सिंचन प्रकल्पांना यापूर्वी मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी सांगितले.

            प्रारंभी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी उपमुख्यमंत्री  फडणवीस यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. संजय तिवारी यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा - रविंद्र ठाकरे

Wed Jul 6 , 2022
– वनामती येथे कृषी दिनानिमित्त परिसंवाद, विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन              नागपूर  : विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या संवर्धनासोबत उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे यांनी केले. 1 जुलैला कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आयोजित परिसंवादात  मार्गदर्शन करताना ते बोलत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com