Ø पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात आढावा
Ø अपघातमुक्त झोन तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवणार
नागपूर :- नागपूर शहरातील वाहतूकिच्या नियमांसदर्भात नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करून अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, तसेच ‘अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात. शहरातील पार्कींगच्या प्रश्नासंदर्भात वाहतूक पोलीस, महानगरपालीका, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना अंमलात आनण्याचे त्यांनी सांगितले
नागपूर शहरातील पार्किंगच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल सुद गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
शहरातील वाहतूकीला अडथळा निर्माण होणार नाही यादृष्टीने वाहनांच्या पार्किंगची सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधीत विभागांनी शहरातील सर्व झोनचा आढावा घेवून पार्किंगसाठी जागा निश्चित करावी अशी सूचना करतांना बिदरी म्हणाल्या की पार्कींग सुविधेसाठी निवड करण्यात आलेल्या ७५ रस्त्यांपैकी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात १८ रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून मार्कींग व फलक लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम टप्याटप्याने न करता एकाचवेळी सर्व कामे करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अपघात प्रवण स्थळांची माहिती संबंधीत रस्त्यावर फलकाच्या माध्यमातून देण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या.
वाहतुकीच्या दृष्टीने शहराची दहा झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक झोनमध्ये विनाअडथळा वाहतुक सुरू राहील यादृष्टीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच अपघात विरहीत झोनला विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने वाहतूक सुरक्षेसंदर्भात दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. अपघातमुक्त शहर म्हणून प्रत्येक झोन ने आपला सहभाग वाढवावा असे आवाहन यावेळी विभागीय आयुक्तांनी केले.
सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी शहर पोलीस वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण करण्यासाठी विविध साहित्य खरेदीला मंजूरी देण्यात आल्याचे सांगितले तर महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी शहरात स्मार्ट ट्राफीक सिग्नल लावण्यात येणार असल्याचे तसेच टप्पा चार अंतर्गत 23.45 कि.मी. लांबीच्या एकूण ३३ सिमेंट रस्त्यांचे कामे २०२५ पुर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. याशिवाय एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ६० हजार ९०४ चौ.मी. क्षेत्रफळाचे ३ हजार ६१४ खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
ट्राफिक सिग्नल प्रकल्प, शहरातील विविध विकास कामांमुळे वाहतुकीला होणार अडथळा, विविध रस्त्यावरील पार्कींग सुविधा, शहरातील सिमेंट रस्ते बांधकाम सुरू असतांना वाहतुकीचे नियमन करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, ट्राफिक सिग्नलसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, शहर बस पार्किंगसाठी खापरी येथे जागेची उपलब्धता, अपघातप्रवण स्थळ आदी विषयांचा यावेळी आढावा घेवून उपाययोजना राबविण्याबाबत दिशानिर्देश देण्यात आले.
बैठकीला उपप्रादेशिक परिवहन विभाग, महसूल, पोलीस, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम, विद्युत आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.