आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– कर्करोग निदान उपचार बाबत संदर्भ सेवांची कार्यपद्धती ठरवा

मुंबई :- राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ म्हणून राबविण्यात यावा, अशा सूचनाही दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रकल्पांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आदी उपस्थित होते. तसेच दूरसंवाद प्रणालीद्वारे आशियाई विकास बँकेचे प्रतिनिधी निशांत जैन सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कर्करोग निदान उपचाराबाबत केंद्राने राष्ट्रीय कर्करोग उपचार धोरण आणले आहे. याच धर्तीवर कर्करोग निदान व उपचारासाठी संदर्भ सेवा देण्याबाबत प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात यावी. कर्करोगावर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या उपचारांचा समावेश असावा. यासंदर्भात विहित काल मर्यादा ठरवून कार्यवाही करण्यात यावी.

वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांचा अवलंब करण्यात यावा. राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात येत आहे. महाविद्यालयांसाठी संबंधित जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालय संलग्न करण्यात आली आहेत. याबाबत जास्त लोकसंख्या व रुग्णसंख्येचे भार असलेल्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालय निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेल्या जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचे स्वतंत्र रुग्णालय आवश्यकतेची पडताळणी करावी. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी आवश्यक असणारी रुग्णालये, नव्याने रुग्णालय उभारणी गरजेची असलेली ठिकाणे या पद्धतीने वर्गीकरण करून विस्तृत नियोजन आराखडा तयार करावा. धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण विभागाचे रुग्णालय निर्माण करण्यात यावे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देताना विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर कालावधी विहित करून शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात पडताळणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राज्यातील प्रकल्प

अलिबाग आणि सिंधुदुर्ग शासकीय सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. अमरावती, वाशिम आणि धाराशिव येथील रुग्णालये निविदा स्तरावर आहेत. गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी उत्कृष्ट केंद्राचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ‘ हब ‘ आणि सात ‘ स्पोक ‘ प्रस्तावित आहेत. तसेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सातारा, चंद्रपूर शासकीय रुग्णालय आणि सर जे.जे. सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये उपकरणे खरेदी करण्यात येत आहेत. तसेच अवयवदान प्रत्यारोपण संबंधित संस्था निर्माण करण्यात येणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

लहान आकारमानाचे पापलेट मासे पकडल्या प्रकरणी दोन नौकांवर कारवाई

Thu Apr 10 , 2025
– पापलेट क्षेत्र असलेल्या पालघर जिल्ह्यात नियमनासाठी पथक तैनात मुंबई  :- उत्तन कार्यक्षेत्रात नौका तपासणीवेळी किमान कायदेशीर आकारमानापेक्षा कमी आकारमानाची चंदेरी पापलेट मासळी पकडल्या प्रकरणी दोन नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन १९८१ (सुधारणा २०२१) अंतर्गत संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. तसेच पापलेट क्षेत्र असलेल्या पालघर जिल्ह्यांतर्गत एमएलएस नियमनासाठी वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!