रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई :- पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे. भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल, त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह ‘सीएसआर’ निधी उभारण्याच्या सूचना त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना दिल्या.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक कुणाल खेमनार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जनरल मॅनेजर (भूसंपादन) बप्पासाहेब थोरात यांच्यासह संबंधित विभाग व यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, अष्टविनायकांपैकी एक असलेले रांजणगाव गणपती हे ठिकाण राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आले आहे. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक उद्योग-व्यवसाय उभे राहिले आहेत. त्यामुळे रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. त्याचा ताण ग्रामपंचायतीच्या पायाभूत सुविधांवर पडत आहे. यासह भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावावी. रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येला आवश्यक नागरी सुविधा देण्यासाठी पुरेशा क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून देण्यात येईल. त्याचसोबत ग्रामपंचायतीच्या हिश्श्यासह उद्योजकांकडून सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी उभारण्यात यावा. रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसावंगी या ग्रामपंचायतीकडून सूचविण्यात आलेली विकासकामे ‘एमआयडीसी’ मार्फत करण्याच्या सूचना त्यांनी ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

हिवरे पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याची उपलब्धता, लोकसंख्या आणि नागरिकांची वाढीव पाण्याची गरज लक्षात घेऊन यंत्रणांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत यासाठीचा आवश्यक निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Rs 15,000 Crore Allocated for Pending Payments in Roads and Buildings Sector

Wed Feb 26 , 2025
Mumbai :- A total of ₹15,091 crore has been allocated so far in the financial year 2024-25 to clear pending payments in the roads and buildings sector under the Public Works Department. Additionally, a total of ₹683.72 crore has been distributed for various components in February 2025, as informed by the Public Works Department. A meeting was recently held under […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!