संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
-तरुण व्यसनाधीन,महिला त्रस्त
पोलीस यंत्रणा व प्रशासनाचे दुर्लक्ष
कामठी प्रतिनिधी ३१ मे – नवीन कामठी तील रामगड भागात अवैध दारू विक्री जोरात सुरू असून या परिसरात राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्याने सकाळपासूनच दारू पिणाऱ्यांची वर्दळ बघायला मिळते चोवीस तास मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्यामुळे तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून महिलांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे
नवीन कामठी भागातील रामगड,आंनद नगर,शिव नगर,रमानगर, विक्तूबाबा नगर, सुदर्शन नगर,गौतम नगर,सैलाब नगर,समता नगर ही सर्वसामान्य कामगारांची वस्ती म्हणून ओळखली जाते घरातील प्रत्येक स्त्री-पुरुष विविध कंपनी, गोदामे, घरकामे, छोटे मोठे व्यवसाय करुन आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात
परंतु या परिसरात काहींनी पानटपरी, नाश्ता पॉईंट नावाने दुकाने थाटून तेथे अवैध दारू विक्री सुरू केली आहे काही महिलांनी तर राजरोसपणे स्वतःच्या घरातूनच दारूविक्री करणे सुरू केले आहे
विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी याच मार्गाने ये-जा करतात पोलिसांची गस्त ही सुरू असते असे असतानाही या अवैध धंद्या बाबत पोलीस व स्थानिक प्रशासन मूग गिळून गप्प का असा प्रश्न येथील सूज्ञ नागरिक विचारत आहेत लोकप्रतिनिधी स्वतःची वोट बँक वाचवण्यासाठी तसेच पोलिसांचे अवैध धंदे करणाऱ्यांची साटेलोटे तर नाही ना असाही प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे
विविध कामांसाठी जाणारा कामगारवर्ग विशेषतः महिला, कामगार, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, सकाळी व सायंकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक आदींना या भागातून मार्गक्रमण करताना नाहक त्रास सहन करावा लागतो तरुणांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे घरातील कर्ता पुरुष दारू मध्ये पैसे उडवत असल्याने महिलावर तणाव येऊन घरगुती वाद निर्माण होतात यामुळे अनेकांचे सुखी संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत अवैध धंदे यामुळे महिलांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे संबंधित विभागाने यावर योग्य ती कारवाई करून ही गंभीर समस्या सोडवावी अशी मागणी परिसरातील महिला व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
-रामगड भागात कष्टकरी कामगारांची वस्ती आहे काबाडकष्ट करून कमावलेला पैसा दारूत उडवला जात आहे म्हणून अवैध दारू विक्रेते दिवसेंदिवस गब्बर होत आहे.
पोलिस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत याबाबत तक्रारी केल्या पण बिटमार्शल चे मैत्रीपूर्ण सबंध असल्याने थातुरमाथुर कार्यवाही करण्यात येते अमितेश कुमार पोलिस आयुक्त, सारंग आव्हाड उपायुक्त परिमंडळ ५,नयन अलूरकर सहाय्यक उपायुक्त यांनी लक्ष देण्याची गरज आहे.