नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात होणाऱ्या अवैध वृक्षतोडी विरोधात कठोर पाउल उचलले जात आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. ७) प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात उद्यान विभागातर्फे पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.४) महापौर दयाशंकर तिवारी यांनी अवैध वृक्ष तोडण्याविरोधात पोलिसात तक्रार करण्याचे प्रशासनाला सक्त निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई करण्यात आली आहे.
नवनिर्माण सोसायटी प्रतापनगर येथे विना परवानगी आंब्याचे झाड कापल्याप्रकरणी यशवंत मधुकर शेंडे यांच्या विरोधात मनपाचे उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्या तर्फे उद्यान निरीक्षक अनंता नागमोते यांनी प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१ अन्वये तक्रार दाखल केली. यशवंत शेंडे यांनी मनपाची परवानगी न घेता ६९ इंच जमिनीलागत गोलाई असलेले एक आंब्याचे झाड बंजारा मजुरांकडून कापून घेतले. सध्या शहरात बंजारा ही अवैध झाड कापणारी मजूरांची टोळी सक्रिय आहे. ही टोळी शहरात मानेवाडा शेषनगर रोड येथे वास्तव्यास आहे, असे उद्यान निरीक्षक अनंता नागमोते यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नागपुरात वृक्षाची अवैध कटाई करणाऱ्या टोळी मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याची तक्रार ग्रीन व्हिजील फाउंडेशनतर्फे महापौर कार्यालयात करण्यात आली होती. या विषयावर गंभीरतेने लक्ष देत महापौरांनी अवैध वृक्ष तोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.