संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे.ही राज्यातील राजकारणाची धुळवळ असली तरी तिचा परिणाम हा आगामी नगरपालिका निवडणुकावर होणार आहे.या राजकीय गोंधळात राज्यात सत्तांतर झाली तर निवडणुका पुन्हा लांबणीवर जाऊन पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीचीच संधी पुन्हा उपलब्ध होणार असल्याची चर्चा रंगत आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.प्रारूप प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय नगरसेवकांचे आरक्षण ही काढण्यात आले आहे.यात कामठी नगर परिषद निवडणुकीचाही समावेश आहे.सध्या कामठी नगर पालिकेत प्रशासक राज असल्याने निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे मात्र इकडे राज्य सरकार विरुद्ध एकनाथ शिंदे वादामुळे सरकारची एकप्रकारे कोंडीच झाली आहे.
-जनतेतून नगराध्यक्ष निवड होण्याची शक्यता
-कांग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना नगराध्यक्ष हे नगरसेवकामधून निवडले जात होते त्यानंतर भाजप चे सरकार आल्याने त्यांनी नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा पायंडा पाडला त्यानंतर भाजपची सत्ता जाउन महाविकास आघाडीचे सरकार आले त्यांनी भाजपच्या काळातील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा जीआर रद्द करुन नगरसेवकामधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला त्यामुळे नगरपालिकेच्या या निवडणुकीत नगरसेवकामधूनच नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया राबविली जाईल मात्र असे असतानाच महाविकास आघाडीचे सरकार जाऊन सत्तांतर होऊन भाजप ची सत्ता बसणार असे चर्चेत असून असे झाले तर भाजप ची सत्ता बसल्यास पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीची संधी निर्माण होणार आहे.याआधी कामठी नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मो शाहजहा शफाअत निवडून आले होते.
प्रभाग रचनेत बदल होणार
-कामठी नगरपालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग रचना, आणि आरक्षण काढले परंतु राज्यात सत्तांतर झाल्यास ही प्रभागरचनाही नव्याने होण्याची शक्यता असल्याचे राजकोय वर्तुळात चर्चेत आहे.त्यामुळे तसे झाले तर प्रभाग रचनेत ज्यांच्या प्रभागाची तोडफोड झाली आणि आरक्षण बदलले आहे त्यांना दिलासा मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही .