नागपूर : दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये मास कॉपी व गैरप्रकार झाल्यास जबाबदार केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक, शिक्षकांवर जागेवरच कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. तालुकास्तरावर संपूर्ण यंत्रणेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल व जिल्हा स्तरावरून स्वतः जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या उपस्थितीत आज ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील बोर्डाच्या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील अनेक सेंटरवर गैरप्रकार यापूर्वी झाले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी असणाऱ्या सर्व सेंटरला पोलीस छावणीचे स्वरूप आले तरी चालेल, मात्र एकाही ठिकाणी गैरप्रकार होता कामा नये. त्यासाठी पोलीस विभागाने शस्त्रधारी अधिकाऱ्यांसह अश्या केंद्रांवर तैनाती द्यावी, असे निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना आज दिले.
तालुकास्तरावरचे बैठे पथक वेगळे व जिल्हा स्तरावरून भरारी पथक वेगळे. तसेच शाळांमध्ये तपासणी करणाऱ्या पथकांची दररोज अदलाबदली करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले आहेत. खासगी, शासकीय, तसेच राजकीय कोणत्याही यंत्रणेकडून दबाव आल्यास थेट दूरध्वनी करून जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधावा असेही त्यांनी आज स्पष्ट केले.या शिवाय शाळास्तरावर बैठेपठक, तालुकास्तरावर फिरते पथक व जिल्हास्तरावर वेगळे फिरते पथक व त्याची नवी कार्यपद्धत याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाभरातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला तालुकास्तरावरून ऑनलाइन सहभागी झाले होते.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर,शिक्षणाधिकारी योजना भानुदास रोकडे यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी होते.