– दीक्षाभूमी मेट्रो स्थानकाच्या फलकाचे फीत कापून उदघाटन
नागपूर :- धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या शुभ मुहूर्तावर दक्षिण-पश्चिम नागपूर स्थित पवित्र दीक्षाभूमीवर रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव “दीक्षाभूमी मेट्रो स्थानक” करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते आणि समतेचे खंदे समर्थक तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भीमपुत्र विनय भांगे यांनी केले.
भीमपुत्र भांगे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात अनेक भीमबांधव, भगिनी आणि अनुयायांनी सहभाग घेतला. दीक्षाभूमीपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आणि रहाटे कॉलनी मेट्रो स्थानक येथे पोहोचून स्थानकाच्या ठिकाणी दीक्षाभूमी मेट्रो स्थानक अश्या नामांतराचा फलक लावून दीक्षाभूमीवर भेट देण्यासाठी आलेल्या एका वयोवृद्ध जोडप्याच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय महत्व अधोरेखित करून रहाटे कॉलनी चौक मेट्रो स्थानकाचे नामांतर “दीक्षाभूमी मेट्रो स्थानक” असे करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली.
भीमपुत्र भांगे यांनी सांगितले की, “दीक्षाभूमी हे केवळ ऐतिहासिक ठिकाण नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील बौद्ध धर्म स्वीकारण्याचे, समतेचे आणि बंधुत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे रहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला दीक्षाभूमीचे नाव दिल्याने केवळ नागपूर किंवा देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील अनुयायांना या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी थेट या मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास करणे अत्यंत सोयीचे होईल.” यावेळी भीमपुत्र विनय भांगे यांनी मेट्रो स्थानकावर उपस्थित जन समुदायाचे आभार व्यक्त केले. यानंतर त्यांच्या निर्देशानुसार १०० फूट धम्मध्वजासह पुन्हा दीक्षाभूमी येथे पोहोचून यात्रेचे समापन केले.
नामांतराचे फायदे
१. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख: दीक्षाभूमी हे समतेचे जागतिक प्रतीक आहे. मेट्रो स्थानकाचे नामांतर केल्यास या ठिकाणाची ओळख जगभरातील पर्यटकांना मिळेल.
२. सुविधा: नागपूरात येणाऱ्या अनुयायांसाठी आणि पर्यटकांसाठी सोईचे असेल की, मेट्रो स्थानक थेट दीक्षाभूमीशी जोडले जाईल.
३. सन्मान: हा नामांतर केवळ प्रशासनिक बदल नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कार्याचा सन्मान आहे.
या आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि या नामांतराच्या मागणीचे अनेक भीमबांधव आणि भगिनींनी जोरदार समर्थन केले. आंदोलनस्थळी भीमपुत्र विनय भांगे, प्रदेश सदस्य वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत संजय सूर्यवंशी, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दक्षिण पश्चिम नागपूर, विनोद भांगे, सामाजिक कार्यकर्ता, विवेक माताडी, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन माताडी, अतुल शेंडे, किशोर धोटे, विनोद मोहोड, विशाल वाहिले, हरिदास गवई, रोहित राऊत, रेखा वाघमारे, प्रतीक वंजारी, मयंक भांगे चेतन चंद्रकर, शिव विश्वकर्मा, मयूर गजघाटे, रोहित शिंगाडे, आर्यन मेश्राम, कृणाल धोटे, पुरुराज बत्रा, प्रशिल शृंगारे व अन्य सदस्य, पदाधिकारी आणि भीम बांधव यांचा समावेश होता.
या आंदोलनाने नागपूरच्या इतिहासात एक नवे पर्व जोडले गेले आहे. आता रहाटे मेट्रो स्थानकाच्या अधिकृत नामांतरासाठी प्रशासनातर्फे लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा सर्व भीम बांधवानी व्यक्त केली आहे.