– पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भारतीय जनता पार्टीने कफ परेड येथे सुरू केलेल्या सुसज्ज मीडिया सेंटरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट देऊन पत्रकारांशी अनौचारिक गप्पा केल्या. या सेंटरमध्ये पत्रकारांना माहिती देण्यासाठी उपलब्ध केलेल्या सुविधांची श्री. फडणवीस यांनी प्रशंसा केली.
फडणवीस यांच्यासमवेत प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि भाजपा प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीसंबंधित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.यावेळच्या हास्यविनोदामुळे मीडिया सेंटर हास्यकल्लोळात बुडाले होते.
या अत्याधुनिक मीडिया सेंटरमधील सुविधांचा इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच वृत्तपत्रांच्या पत्रकारांना वार्तासंकलन कामी लाभ घेता येईल, असे सांगत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.या मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेसाठी भव्य सभागृह,इलेक्ट्रॉनिस मीडियासाठी स्टुडिओ, संपर्क यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध आहेत.