– वसंत ढोमणे ठरले पहिले गृह मतदार
नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात 14 एप्रिलपासून गृह मतदानाला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली.
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील डायमंड नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे यांनी सर्वप्रथम आपला गृह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत, क्षेत्रीय अधिकारी राजूरकर, केंद्राध्यक्ष मंगला गंगारे, बीएलओ वंदना तृपकाने यावेळी उपस्थित होते.
85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा व त्यांनाही मतदान करता यादृष्टीने दिनांक 14 ते 17 एप्रिल या कालावधीत नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील एकूण 2 हजार 360 मतदार गृहमतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नागपूरसाठी निवडणूक विभागातर्फे 160 टीम तयार करण्यात आल्या असून यात 480 अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 105 टीम तयार करण्यात आल्या असून यात 315 अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना जिल्हा निवडणूक विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.