– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री तेजश्री प्रधान, पूजा कुळकर्णी यांची उपस्थिती
नागपूर :- हिंदू नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा. आनंदाची अपेक्षांची, ध्येय, आकांक्षांची उंच गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपल्या नव्या पिढीला कळावी, त्यांच्यात या परंपरेचे बीज रूजावे व त्यांनी ही परंपरा संस्कृती पुढे प्रवाहित करावी या उदात्त हेतून श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि नववर्ष अभिनंदन समारोह समितीद्वारे हिंदू नववर्ष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे. या समारंभात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती आमदार संदीप जोशी यांनी दिली आहे.
रविवारी ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी ६ वाजता तात्या टोपे नगर गणेश मंदिर ते आठ रस्ता चौक लक्ष्मी नगर पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत ई-रिक्षांमधून गुलाब पाकळ्यांची उधळण, डिजे, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामा यांच्या करिता तीन घोडे, लेझीम, आखाडा, राम दरबार, ढोल ताशे, माहेश्वरी महिलांचा समूह, महादेव नंदी, झाकी, आदिवासी नृत्य, महाकाल, बाहुबली हनुमान आदींचा समावेश असणार आहे. आठ रस्ता चौकात भव्य गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आले आहे.
सर्व नागरिकांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन हिंदू नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आमदार संदीप जोशी यांनी केले आहे.
नव वर्षाच्या स्वागत समारंभ आयोजनासाठी नुतनवर्ष अभिनंदन समारोह समितीचे सर्वश्री मनोज देशपांडे, गजानन निशीतकर, जयंता आदमने, शंतनू येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, प्रकाश रथकंठीवार, प्रफुल्ल माटेगांवकर, निरज दोन्तुलवार, अमोल वटक, अजय डागा, दिपक वानखेडे, मंगेश उपासनी, काजल बागडी, अनुसया गुप्ता, आनंद टोळ आदी परिश्रम घेत आहेत.