– विविध विषयांवर हेरीटेज संवर्धन समिती बैठकीत चर्चा
नागपूर :- महाल येथील मनपाच्या टाऊन हॉलच्या प्रस्तावित नुतनीकरणासह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबाग येथील हेरीटेज इमारतीतील दुरुस्ती, तसेच झिरो माईल आणि कस्तुरचंद पार्क येथील ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती तसेच सौदार्यीकरणाच्या कामाला हेरीटेज संवर्धन समितीने मान्यता दिली.
गुरुवारी (ता.४) मनपा मुख्यालयातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या नगर रचना विभागामध्ये हेरिटेज संवर्धन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रसिद्ध वास्तूविशारद व समिती अध्यक्ष अशोक मोखा, नगर रचना विभागाचे उपसंचालक तथा सदस्य सचिव हेरिटेज समिती प्रमोद गांवडे, स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर, नगर रचना शाखा कार्यालयाचे गु. मो. काझी, नागपूर सुधार प्रन्यासचे अनिल राठोड, प्रकल्प ३च्या कार्यकारी अभियंता श्रीमती अ.दी. यलचरवार, अनुप तारटेकर यांच्यासह इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत महाल येथील नवीन टाऊन हॉल बांधकामाच्या प्रस्तावित बांधकाम नकाशानुसार परिसरातील जागेवरील हेरीटेज स्थळ म्हणून असणारी जुनी वाचनालय इमारत आणि टाऊन हॉल इमारतीमध्ये प्रस्तावित नुतनीकरण कार्याचा विषय चर्चेस ठेवण्यात आला. यात जुने हेरीटेज स्थळ कायम ठेऊन परिसरात नवीन टाऊन हॉल व महानगरपालिकेचे ऑफीसचे बांधकाम करण्याकरीता हेरीटेज संवर्धन समितीने परवानगी दिली. तसेच बांधकामादरम्यान हेरीटेज वास्तूचे महत्व कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना देखील देण्यात आल्या.
याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर महाराजबाग येथील हेरीटेज इमारतीमधील कुलगुरू, कुलसचिव, मिटींग हॉल व कार्यालयातील पाण्यामुळे खराब झालेल्या सिलींग व भिंतीचे पॅनेलिंग दुरूस्तीच्या कामाला देखील बैठकीत परवानगी देण्यात आली.
झिरो माईल आणि कस्तुरचंद पार्क येथील ऐतिहासिक वास्तूची दुरुस्ती तसेच सौदार्यीकरणाच्या कामाचा विषय देखील बैठकीत मांडण्यात आला. त्यानुसार कस्तुरचंद पार्क येथील ऐतिहासिक इमारतीचे (छत्री) व या परिसराचे सौंदर्याकरण करण्याकरीताच्या विषयावर चर्चा करून त्यासंबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला मान्यता देण्यात आली, मान्यता प्रदान करतांना कामाचा अहवाल दर महिन्यात सादर करावा अशी सूचना देखील संबंधित विभागाला करण्यात आली. याशिवाय झिरो माईल येथील ऐतिहासिक वास्तुची पुर्ण स्थापना / दुरुस्ती तसेच सौदर्याकरण करण्याच्या कामाला देखील मान्यता देण्यात आली.