महिलेची अब्रू वाचविणाऱ्या “त्या” युवक कर्मचाऱ्यांचा कंपनीने केला जाहीर सत्कार!
वाडी :- समाजात महिलांबाबत अनेक वाईट घटना घडत असतात परंतु लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या अतिशय नगण्य असल्याने प्रत्येक ठिकाणी गल्ली पर्यंत पोलीस जाऊ शकत नाही त्यामुळे पोलीस मित्र होऊन अशा वाईट प्रवृत्तीला आळा घालण्याचे मनोगत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाडे यांनी महिंद्रा प्राॅव्हेंशियल कंपनीच्या वतीने आयोजित महिलेची अब्रू वाचविणाऱा कर्मचारी शुभम डवरे व त्याची पत्नी श्वेता डवरे यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केले. एमआयडीसी औद्योगिक परिसरात असलेल्या महिंद्रा प्राॅव्हेंशियल कंपनीत झालेल्या या कार्यक्रमात कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आशिष काळे,सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाडे,वाडी पत्रकार संघाचे सचिव विजय वानखेडे,
व्यवस्थापकीय प्रमुख गिरीश बोबाटे, सीईओ गुरमीतसिंग सुरी, जनरल मॅनेजर शरद द्विवेदी, प्रशांत श्रवणे, आशिष शर्मा इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अतिथींचे पुष्पबुके देऊन स्वागत करण्यात आले.
तद्नंतर कंपनीचा कर्मचारी व महिलेची अब्रू वाचविणारा युवक शुभम डवरे व त्याची पत्नी श्वेता डवरे हिचा शॉल, पुष्पबुके, स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
प्रास्तविकात आयोजक गिरीश बोबाटे यांनी या युवकाच्या साहसी कार्याची माहिती इतरांना होऊन प्रेरणा मिळावी याकरिता सत्काराचा उद्देश असल्याचे सांगितले.तर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आशिष काळे यांनी साहसी कर्मचारी शुभम डवरेचे कार्य वाखाणन्यासारखे असल्याचे सांगितले. विजय वानखडे यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन गिरीश बोबाटे व आभार गुरमीतसिंग सुरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला कंपनीचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.