चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप
नागपूर : अनेक महापुरुषांनी शुन्यातून आपले अस्तिव निर्माण केले आहे. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. कठोर परिश्रम हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जयदीप पांडे यांनी आज येथे केले.
जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातर्फे आयोजित चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, पीठासीन अधिकारी तथा अध्यक्ष बाल न्याय मंडळ सविता माळी, महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त अपर्णा कोल्हे, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत, स्लम सॅाकरचे अध्यक्ष विजय बारसे यांच्यासह बाल कल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.
मिसाईल मॅन अशी ओळख असणा-या डॅा. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. यशप्राप्तीसाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. आपणही आयुष्यात यशप्राप्ती करू शकतो. त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी ठेवा, असे आवाहन न्या. पांडे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे यांनी केले. 17 ते 19 जानेवारीदरम्यान चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी प्रास्ताविकेत सांगितले.
स्लॅम सॅाकरचे संस्थापक विजय बारसे यांनीही या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करीत आपले विचार व्यक्त केले. बाल व क्रीडा महोत्सवाचे आयोजनातून भविष्यात अनेक गुणवान खेळाडू घडण्यास मदत होईल. स्लॅम सॅाकरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॅालपटू घडविण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी आपले विचार व्यक्त केले. क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्रातही करिअर घडविता येत असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमादरम्यान क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.