– मनपाचे बेघरांना मदत करण्याचे नागरिकांना आवाहन
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपुरात थंडीने जोर धरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत नागपूर महानगरपालिकेच्या मनपा बेघर निवारा चमुद्वारे बेघरांना आसरा देण्यात आला. थंडीत बेघर निवारा केंद्रांवर उब मिळाल्याने बेघरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे दिसून आले.
नागपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा चमूने शहरभर विशेष मोहीम राबवित अनेक गृहहीनांना जवळच्या निवारा केंद्रात आश्रय दिला. वाढत्या थंडीच्या पाश्वभूमीवर मनपा बेघर निवारा चमुद्वारे विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी मनपाद्वारे गाडीची विशेष सोय करून देण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फूटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून निवारा केंद्रात नेण्यात येत आहे. समाज विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे आणि समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात समाज विकास विभागाचे कर्मचारी, बेघर निवारा केंद्राचे कर्मचारी काम करीत आहे.
रस्त्यांवर राहणाऱ्या बेघरांसाठी मनपा समाज कल्याणचा मदतीचा हात. नागपूर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नागपुर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे गरीब व गरजू बेघरांसाठी मूलभूत सोयी सुविधा (पलंग, गादी, बेडशीट, ब्लॅंकेट) २८० बेडची क्षमता असलेले बेघर निवारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ६० वर्षावरील वृद्धांना मोफत भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर शहरात मनपा बुटी कन्या शाळा, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, रेल्वे स्टेशन पुलाच्या खाली, गणेश टेकडी जवळ, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा टिमकी भांनखेडा, सतरंजीपुरा झोन जुनी इमारत, समाज भवन इंदोरा मठ मोहल्ला, समाज भवन इंदोरा मठ मोहल्ला नवीन इमारत असे शहरात सहा ठिकाणी बेघरांसाठी सर्व आवश्यक सोयी सुविधा युक्त २४ तास व्यवस्था असलेले शहरी बेघर निवारे आहे. तरी नागरिकांनी बेघर निवारा केंद्रांवरील नागरिकांना मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.