नागपूर :- हातमाग महामंडाळाची उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगवर जास्त भर देण्याचे आवाहन वस्रोद्योगआयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाची उत्पादने विक्रीसाठी स्वाईप मशीनमधील ऑनलाईन सॉफ्टवेअर चे उद्घाटन गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय निमजे, वस्रोद्योग सहआयुक्त निशा पाटील, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख सचिन भाके यावेळी उपस्थित होते.
गाडीलकर पुढे म्हणाले, हातमाग महामंडळाची विविध ठिकाणी सात विक्री केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी होणाऱ्या विविध उत्पादन-विक्रींची नोंद नवीन सॉफ्टवेअरमुळे तत्क्षणी ऑनलाईन होईल. या डेटाचा उपयोग जास्त मागणी असणाऱ्या उत्पादनांची अधिक निर्मिती करण्यासाठी होईल. तसेच हातमाग विणकरांना त्यांच्या कष्टाचा थेट मोबदला मिळेल. महामंडळाला देखील दैनिक खप, आर्थिक ताळमेळसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होणारआहे. या सर्व प्रक्रियेचा पुढील मार्केटिंगचे धोरण ठरविण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या फॅशन टेक्नोलॉजी विभागासोबत सामजस्य करार करण्यात आला. यानुसार संस्थेचे विद्यार्थी महामंडळाला विविध डिझाईन उपलब्ध करून देतील तर महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना हातमाग तंत्रज्ञानाची तसेच विविध कंपन्यामध्ये प्रत्यक्ष भेटी घडवून तेथील कामाची माहिती देण्यात येईल.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण गेडाम यांनी केले तर फॅशन टेक्नोलॉजीच्या प्राचार्या क्रीपा सावलानी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
सहायक आयुक्त गंगाधर गजभिये, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक संदीप ठुबरीकर, आयसीआयसीआय बँकेचे प्रबंधक सचिन संकुरवार, स्कुल ऑफ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रा. श्रीकांत चितळे तसेच हातमाग महामंडळ वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी कर्मचारी, विणकर, कामगार यावेळी उपस्थित होते.