नागपूर :- कापूस पिकावरील मावा, तुडतुडे आणि फुलकिडे तसेच सोयाबिनवरील पिवळा मोझॅइक आदी विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कोरडवाहू कापूस पिकावर फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरुपात याच महिन्यात दिसून येतो. या किडींमुळे कपाशीचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने एकात्मिक किड व्यवस्थापानाचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. सिरफीड माशी, कातीन, ढालकिडे आदी नैसर्गिक कीटकांची संख्या वाढल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पिकातील डोमकळ्या नियमीत शोधून त्या अळीसहीत नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 5 टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आल्यास प्रोफेनो फॉस 50 टक्के प्रवाही 30 मिली, क्लोरॅट्रानीलिप्रोल 18.5 टक्के एससी 3 मिली किंवा थायोडीकार्ब 75 टक्के भुकटी 20ग्रॅम यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सोयाबीन रोगावर मोझॅईक रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे शेताबाहेर काढून नष्ट करणे, पिकावरील व बांधावरील तण नियंत्रित करणे यासह पांढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे 15×30 सेमी आकाराचे एकरी 20-25 प्रमाणात पिकाच्या समकक्ष उंचीवर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भात पिकावर खोडकिडीचे नियंत्रण
भात पिकावरील खोडकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल (सी.एस. 5 टक्के) 20 मिली किंवा ली-फ्युबेंडामाईड 39 (सीएस 35 टक्के) 2 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11 हे 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.